नासर्डीत बुडून मुलाचा मृत्यू; भोवर्‍यात सापडल्याने गुदमरला जीव

नाशिक : मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्याच्या भोवर्‍यात सापडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१७) दुपारी नंदिनी (नासर्डी) नदी, मिलिंदनगर, तिडके कॉलनी येथे घडली. सागर लल्लन चौधरी (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्यासमवेत आणखी एक मुलगा बुडाल्याची भीती प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवार सुटीचा दिवस असल्याने मिलिंदनगरमधील सात ते आठ मुले आणि सागर मित्तल टॉवरजवळील क्रांतीनगर परिसरातील नासर्डी नदीपात्रात खेळायला गेले होते. दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही मुले पाण्यात पोहण्यास उतरली. तेव्हा सागरही पाण्यात उतरला. त्याचवेळी सागरही मित्रांसमवेत नदीपात्रात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने सागर बुडू लागला त्याचे फक्त हात वर दिसत असल्याचे पाहून घाबरलेल्या मुलांनी पळ काढला. दरम्यान, सागर वाहत मिलिंदनगरजवळील पाण्याच्या भोवर्‍यात अडकला. मुलांनी नागरिकांना सागर बुडाल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखत नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे अभिजित देशमुख, भीमाशंकर खोडे, शिवाजी फुगट, दिनेश चाकोरे, विजय नागपूरे आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत आहिरे व पोलिसांनी घटनास्थळी आले. त्यांनी मिलिंदनगरजवळील नदीपात्रातून सागरला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला डॉ. पाटील यांनी मृत घोषित केले.

तर वाचला असता सागर

सागर आणि त्याचे मित्र नासर्डी नदीपात्रालगत खेळत होते. खेळता-खेळता ते नदीपात्रात उतरले. सागर पाण्याबाहेर आला नाही. तो बुडू लागल्याचे पाहून मुले पळून गेली. थोड्यावेळाने मुलांनी परिसरातील नागरिकांना सागर पाण्यात बुडत असल्याचे सांगितले. त्यानुसार नागरिकांनी नदीपात्रालगत धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. सागर पाण्याच्या भोवर्‍यात अडकला. सागरला नागरिकांनी बुडताना पाहिले असते किंवा त्याच्या मित्रांनी लगेच आरडाओरड केली असती तर त्याचा जीव वाचला असला, असे प्रत्यक्षदर्शी जाधव यांनी सांगितले.

मुलगा बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी गेलो. नासर्डी नदीपात्रात ६ ते ८ मुले पोहण्यास गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर आणले. त्यात जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत मृत घोषित केले. : चंद्रकांत अहिरे, पोलीस निरीक्षक, मुंबई नाका

 

सागर चौधरीचे वडील आमच्या घराशेजारी भाड्याच्या खोलीत राहतात. त्याचे वडील वेटर असून, आई धुणीभांड्याचे काम करते. सागरचा जन्म नाशिकमध्येच झाला असून, तो मिलिंदनगरमधील सर्वांचा लाडका होता. त्याला एक मोठा भाऊ व लहान बहीण आहे. तो दुपारी मित्रांसमवेत नदीपात्रात गेला होता. पाण्याचा भोवर्‍यात अडकल्याचे दिसताच मिलिंदनगरमधील रहिवाशी मदतीला धावून आले. नागरिकांनी त्याला पाण्यातून बाहेर आणत रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच मिलिंदनगरमध्ये शोककळा पसरली. चौधरी कुटुंबिय परप्रांतीय असून, त्यांच्या दु:खात मिलिंदनगरमधील रहिवाशी सहभागी झाले आहेत. अशी वेळ कोणावर यायला नको. : बापू जाधव, प्रत्यक्षदर्शी

वडिलांचा आक्रोश अन् काळीज चिरणारा हंबरडा

      सागर खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही

मिलिंदनगरमधील १२ वर्षीय सागर चौधरीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सागरचे वडील ललन चौधरी, भाऊ व मिलिंदनगरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. जिल्हा रुग्णालयात सागरचा मृतदेह पाहताच सर्वजण शोकमग्न झाले होते. त्याच्या वडिलांनी हंबरडा फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर, त्याचा भाऊ नि:शब्द झाला होता. हे द़ृश्य पाहून जिल्हा रुग्णालयातील रूग्ण, त्यांचे नातेवाईक हेलावून गेले होते. अशी वेळ कोणावरही यायला नको, असे प्रत्येकजण हे द़ृश्य पाहून म्हणत होता.

सागरला मोठा भाऊ व लहान बहीण आहे. त्याचे वडील नाशिक शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. तर आई धुणीभांडी करते. सागर सातवीला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने तो मित्रांसमवेत खेळत होता. तर त्याचे आई-वडील कामाला गेलेेले होते. ललन चौधरी हे परप्रांतीय आहेत. ते १५ वर्षांपासून मिलिंदनगरमध्ये भाड्याच्या खोलीत कुटुंबियांसमवेत राहतात. त्यामुळे त्यांचे परिसरातील नागरिकांशी स्नेह व आपुलकीचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या तीनही मुलांचा नाशिकमध्येच जन्म झाला. त्यामुळे चौधरी दाम्पत्य कामाला गेल्यावर परिसरातील नागरिकच त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तिन्ही मुलांमध्ये सागर सर्वांचा लाडका होता. तो बुडाल्याचे समजत मिलिंदनगरकरांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. त्यावेळी ललन चौधरी आणि त्यांचे भाऊ जिल्हा रुग्णालयात आले. चौधरी यांचे नाशिकमध्ये नातेवाईक नसल्याने मिलिंदनगरकरांनीच त्यांना धीर दिला. सागरचे वडील त्याचा मृतदेह पाहून सारखे हंबरडा फोडायचे, त्याचा भाऊ एका कोपर्‍यात नि:शब्द बसला. तर चौधरी यांचा भाऊ मोबाईलवरून परप्रांतातील नातेवाईकांना सागरचा मृत्यू झाल्याचे हिंदी भाषेतून सांगायचा. त्यावेळी मिलिंदनगरकर डॉक्टर, परिचारिका, पोलिसांशी मराठीतून संवाद साधत मदत करायचे. हे द़ृश्य पाहून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रूग्ण, त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले होते. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चौधरी कुटुंबियांशी आणि मिलिंदनगरकरांशी माणुसकीच्या द़ृष्टीकोनातून संवाद साधत पंचनामा केला.