मुलांनो, तंत्रज्ञानासोबतच साहित्य क्षेत्रातही स्मार्ट व्हा

मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचा सल्ला

Dilip Prabhavalkar
बालकुमार मेळाव्यांतर्गत झालेल्या स्पर्धेतील विजेत्या बालकाचा सत्कार करताना मान्यवर

नाशिक – आजकालची मुलं अधिक स्मार्ट झाली आहेत. हा स्मार्टनेस साहित्यक्षेत्रातही दिसावा. पुस्तकाची संगत आणि साहित्याची साथ सोडू नका, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिला. तात्या विंचू, बोक्या सातबंडे, चौकट राजा अशा विविध भूमिकांचा पटही त्यांनी अत्यंत सहजपणे उलडला.

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित बालकुमार मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकात कुठली ना कुठली कला असते. ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती व्यक्त करा. त्यासाठी पालकांही मुलांकडे लक्ष द्यावं. वाचलेलं सर्व साहित्य लिहायला प्रेरणा देतं. दररोज किमान तीन-चार ओळींचं लिखाण करा, पुस्तकाची तीन-चार पानं वाचा, असंही दिलीप प्रभावळकरांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला. बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरंही दिली. चित्रपटात चिमणराव, बोक्या सातबंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे अशा विविध भूमिकांबद्दलही त्यांनी लहानग्यांशी मुक्तसंवाद साधला.