घरक्राइमवडिलांचा आक्रोश अन् काळीज चिरणारा हंबरडा

वडिलांचा आक्रोश अन् काळीज चिरणारा हंबरडा

Subscribe

सागर खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही

मिलिंदनगरमधील १२ वर्षीय सागर चौधरीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सागरचे वडील ललन चौधरी, भाऊ व मिलिंदनगरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. जिल्हा रुग्णालयात सागरचा मृतदेह पाहताच सर्वजण शोकमग्न झाले होते. त्याच्या वडिलांनी हंबरडा फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर, त्याचा भाऊ नि:शब्द झाला होता. हे द़ृश्य पाहून जिल्हा रुग्णालयातील रूग्ण, त्यांचे नातेवाईक हेलावून गेले होते. अशी वेळ कोणावरही यायला नको, असे प्रत्येकजण हे द़ृश्य पाहून म्हणत होता.

सागरला मोठा भाऊ व लहान बहीण आहे. त्याचे वडील नाशिक शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. तर आई धुणीभांडी करते. सागर सातवीला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने तो मित्रांसमवेत खेळत होता. तर त्याचे आई-वडील कामाला गेलेेले होते. ललन चौधरी हे परप्रांतीय आहेत. ते १५ वर्षांपासून मिलिंदनगरमध्ये भाड्याच्या खोलीत कुटुंबियांसमवेत राहतात. त्यामुळे त्यांचे परिसरातील नागरिकांशी स्नेह व आपुलकीचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या तीनही मुलांचा नाशिकमध्येच जन्म झाला. त्यामुळे चौधरी दाम्पत्य कामाला गेल्यावर परिसरातील नागरिकच त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तिन्ही मुलांमध्ये सागर सर्वांचा लाडका होता. तो बुडाल्याचे समजत मिलिंदनगरकरांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. त्यावेळी ललन चौधरी आणि त्यांचे भाऊ जिल्हा रुग्णालयात आले. चौधरी यांचे नाशिकमध्ये नातेवाईक नसल्याने मिलिंदनगरकरांनीच त्यांना धीर दिला. सागरचे वडील त्याचा मृतदेह पाहून सारखे हंबरडा फोडायचे, त्याचा भाऊ एका कोपर्‍यात नि:शब्द बसला. तर चौधरी यांचा भाऊ मोबाईलवरून परप्रांतातील नातेवाईकांना सागरचा मृत्यू झाल्याचे हिंदी भाषेतून सांगायचा. त्यावेळी मिलिंदनगरकर डॉक्टर, परिचारिका, पोलिसांशी मराठीतून संवाद साधत मदत करायचे. हे द़ृश्य पाहून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रूग्ण, त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले होते. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चौधरी कुटुंबियांशी आणि मिलिंदनगरकरांशी माणुसकीच्या द़ृष्टीकोनातून संवाद साधत पंचनामा केला.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -