घरताज्या घडामोडीकोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत; अनिल परब यांची...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत; अनिल परब यांची घोषणा 

Subscribe

ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देशही यावेळी अनिल परब यांनी प्रशासनाला दिले.  

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी केली. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचेही परब यांनी सांगितले. एसटीचा मंगळवारी, १ जूनला ७३ वा वर्धापनदिन पार पडला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्या वर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवला होता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत अनिल परब यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीही हा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवला असल्याचे घोषित केले.

- Advertisement -

कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि जे निकषात बसत असतील, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, पण जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देणार असल्याचे परब म्हणाले.

सहा महिन्यांत नोकरी

कोरोना काळातही एसटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने काम करत होते. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देशही यावेळी अनिल परब यांनी प्रशासनाला दिले.

- Advertisement -

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न

कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे परब यांनी सांगितले. सद्या एसटी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.

महाकार्गोच्या चालकांना १५० रूपये भत्ता

मागील वर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जाऊन मुक्काम करावा लागतो. अशा चालकांना आता सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा परब यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -