(China intrusion) मुंबई : चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली आहे. लडाखमध्ये दोन काऊंटी (परगणे) निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लडाखच्या बाबतीत मोदी सरकार गंभीर नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. (Sanjay Raut criticizes Modi government on Ladakh issue)
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण बांधण्यास मान्यता दिली आहे. धरणाबाबतच्या घोषणेमुळे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली आहे. याशिवाय, चीनने लडाखच्या होटन भागात दोन काऊंटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रदेशासंदर्भात चीनने हा निर्णय घेतला आहे, तो प्रदेश प्रत्यक्षात भारतीय भूमी आहे. लडाखच्या या भागावर चीनने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
हेही वाचा – Pawar Vs Pawar : विलीनीकरणाचा निर्णय शरद पवारांनी घ्यावा, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका
यापार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लडाखमधील घुसखोरी केवळ पाहात आहेत. ते तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. पंतप्रधान मोदी तर, आम आदमी पार्टीवर हल्लाबोल करत आहेत. उलट त्याऐवजी त्यांनी चीनला जरब दाखवायला हवी. निवडणूक महत्त्वाची नाही, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, आप एक संकट असल्याचे नरेंद्र मोदी सांगतात, मग लडाखमध्ये घुसलेले चीन त्यांना संकट वाटत नाही का? लडाखची जमीन चीनच्या ताब्यात आहे, सरकार केवळ तेथील सरकारला पत्र लिहित आहे.
काश्मिरच्या नावावरून अमित शहांवर टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात काश्मिरचे नाव बदलण्याचे संकेत दिले होते. काश्मिर हा देशाचा असा भाग आहे, जिथे भारताची दहा हजार वर्षे जुनी संस्कृती आहे. कश्यप ऋषींच्या नावानेच काश्मिरची स्थापना झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. अमित शहा सांगतात की काश्मिरचे नाव बदलणार, पण लडाखसुद्धा काश्मिरचाच भाग आहे आणि तिथे चीनने घुसखोरी केली आहे, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे, असे खासदार राऊत म्हणाले.
चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे, याबद्दल प्रश्न विचारला की, अमित शहा म्हणतात आम्ही काश्मिरचे नाव बदलू. वास्तवात, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. जम्मू काश्मिरमधून कलम 370 काढल्यानंतर चीनच्या कारवायांमध्ये का वाढ झाली? त्यासाठी कोण जबाबदार आहे? राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने ही खूपच गंभीर बाब आहे आणि आपले सरकार याबाबतीत गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.