(Chinese invasion) मुंबई : प्रयागराज येथे कुंभ सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून दहा हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले, पण कुंभस्नानासाठी आलेले सामान्य लोक उघड्यावरच झोपले आहेत, कुडकुडत बसले आहेत. कारण सर्व व्यवस्था व्हीआयपींसाठी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कुंभस्नानासाठी पोहोचले. गंगेत डुबकी मारली आणि संरक्षणमंत्र्यांना सुरक्षित डुबकी मारता यावी यासाठी ‘घाट’ पूर्णपणे बंद करून ठेवला. त्यामुळे साधू, संत, संन्यासी, जनता यांचे हाल झाले. संरक्षणमंत्र्यांनी ‘डुबकी’ मारल्याने लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य मागे हटेल आणि भारताची गिळलेली जमीन चीन मोकळी करेल अशी आशा आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
मागे एकदा अशाच सोहळ्यात प्रयागतीर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांचे पाय धुतले होते आणि त्याचा सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे दलितांच्या जीवनात कोणताच फरक पडला नाही. उलट देशभरात दलितांवरील अत्याचारांत वाढ झाली, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.
हेही वाचा – SS UBT Vs Mahayuti : दावोस दावोस म्हणून फार दंगा सुरूय, सुषमा अंधारेंच्या कानपिचक्या
इकडे भारतात ‘कुंभ’ उत्सव सुरू असताना तिकडे चीनने व्यापार-उद्योगात मोठी झेप घेतल्याचे समोर आले. या काळात चीनने त्यांचा जागतिक व्यापार, निर्यात आठ टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे तेथील व्यापार, रोजगारात चमक निर्माण झाली. आपण विज्ञान, ज्ञानाचा मार्ग सोडून कुंभात दंग आहोत. भारताचे व्यापार, संरक्षण, उद्योग, रोजगार मंत्री स्नानासाठी घाटावर रांगेत उभे आहेत, अशी कोपरखळी ठाकरे यांनी दिली आहे.
कुंभाचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी तेथे घडत आहेत. अनेक सुंदऱ्या वेशभूषा करून आपण साध्वी असल्याचे नाट्य वठवीत आहेत आणि त्यांच्या मॉडेलिंगचे बिंग उघडे पडत आहे. कोणीही येतो आणि स्वतःला साधू, साध्वी तसेच संत, संन्यासी म्हणून घोषित करतो. मीडिया त्यांना प्रसिद्धी देतो, असा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे.
सर्वसंगपरित्याग करून लोक कसे अध्यात्माकडे वळत आहेत याचे मार्केटिंग भाजपाचा आयटी सेल करीत आहे. अभय सिंग ऊर्फ आयआयटी बाबा या काळात गाजला, पण हा उच्चशिक्षित तरुण नशेच्या आहारी गेल्याने त्या नशेत भलतेच ज्ञान पाजळीत होता. गांजा, चिलीम मारून बेबंद नाचताना त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले. त्यामुळे हिंदुत्वाची बदनामीच झाली. हा अभय सिंग ऊर्फ आयआयटी बाबा आता कुंभातून गायब झाला, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. (Chinese invasion: Defense Minister on Thackeray’s radar)
हेही वाचा – Mahakumbh 2025 : भाजपाकडून धर्मसोहळ्याचे जोरदार मार्केटिंग, ठाकरेंचे टीकास्त्र