कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी काळा तिठा लागतो, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका

सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आला असल्याचे मला माहिती आहे. नाहीतर मी बांधला असे काही बोलतील

Chipi airport uddhav thackeray slams narayan rane on Chipi Airport Inauguration
कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी काळा तिठा लागतो, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख मंत्री, नेतेमंडळी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. नारायण राणेंनी आपल्या मनोगतमध्ये केलेल्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून काळा तिठा आणावा लागतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राणेंवर पलटवार केला आहे. तसेच कोकणातील विकासकामे माझ्या प्रयत्नांमुळे झाली असल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आला असल्याचे मला माहिती आहे. नाहीतर मी बांधला असे काही बोलतील असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनात राणेंवर हल्लाबोल करताना म्हटलं आहे की, सगळं सुंदर चालु असताना म्हणतात की, चांगली गोष्ट असेल तर नजर लागू नये यासाठी एखादा काळा तिठ्ठा आणावा लागतो ती लावणारी काही लोकं आहेत. गालबोट लागू नये म्हणून काळा तिठा आणावा लागतो. नारायण राणे आपण बोला ते खरं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे ती संयमी आहे म्हणून भयभीत होऊन काही करेल अशी आजीबात नाही ती मर्द आहे म्हणून तीने अनेक वर्ष आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी दिला आहे. म्हणून त्यांनी विनायक राऊत यांना खासदार म्हणून निवडून दिले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना चिमटा काढला आहे.

पुढे मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंनी म्हटलंय की, बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नाही त्यामुळे त्यांनी खोटं बोलणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. हा सुद्धा इतिहास आहे. कटू असेल तरी चालेल पण सत्य बोल खोटं बोलणं मला परवडणारं नाही. गेट आऊट हे बाळासाहेबांनी दाखवलं आहे. त्याच्यामुळे मला इतिहासात जायचं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राणेंचा समाचार घेतला आहे.

पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो

आपण केंद्रात मंत्री आहेत. लघू का असेना सूक्ष्म का असेना तुम्हाला मोठं खातं दिलं आहे. तुमच्या खात्याच्या उपयोग महाराष्ट्राला मिळवून द्याल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्या महाविद्यालयासाठी जेव्हा फोन केला तेव्हा मी दुसऱ्या क्षणाला सही केली. कारण ते जनतेचे काम होते. तिकडे कोतेपणा आणू शकत नाही. विचाराला विरोध ठीक आहे. पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो अंगी बानवावा लागतो म्हणून बोलतात तिळगूळ घे आणि गोड बोल ही जाहीरसभा नाही परंतु दुर्दैवाने मला बोलावं लागलं नाहीतर हा कोकण आणि राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे.


हेही वाचा : विमानतळ उद्घाटनाला पायगुण लागतो, मुख्यमंत्री ठाकरेंचा उल्लेख करत देसाईंनी लगावला टोला