Homeमहाराष्ट्रChitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय...

Chitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोगल घराण्यातील सहावा बादशहा औरंगजेबशी केली आहे. यावरून भाजपा संतप्त झाली असून त्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, गुजरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिला असल्याचे प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिले आहे.

हेही वाचा – Pawar Family : पवार कुटुंबातील फुटीबाबत शरद पवारांच्या बहिणीचा मोठा दावा, म्हणाल्या…

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ‘इथे ओशाळले लॉजिक!’ असे शीर्षक देत यासंदर्भात ट्वीट केले आहे. संजय राऊत यांच्या याच लॅाजिकने बोलायचे झाले तर संजय राऊत, त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि दाऊद इब्राहिम हे तिघांचाही जन्म कोकणात झाला. या तिघांनीही मुंबईसह कोकणप्रांत नासवला. पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर त्याची कीर्ती वाढवली. त्यामुळे कोण कुठे जन्माला आले, यावरून कुठल्याच प्रांताला – राज्याला कमीपणाने लेखण्याचे कारण नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला असेल, पण त्याच भूमीत महात्मा गांधी यांच्यासारखे जगाला वंदनीय महापुरुषही जन्माला आले. गुजरातचा गौरव महात्मा गांधी यांच्यामुळे आहे; औरंगजेबामुळे नाही, असे सांगतानाच याच गुजराती भूमीने नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिला आहे. ही नुसती गुजराती बांधवांसाठी नाही, तर अवघ्या भारतवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मराठी मावळ्यांनी याच मातीत दफन केलेल्या औरंगजेबाची मदत घेऊन महाराष्ट्र जिंकायची स्वप्ने बघू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Sushama Andhare : सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना सुनावले खडेबोल

काय म्हणाले होते राऊत?

बुलढाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची विचारसरणी औरंगजेबासारखी आहे. या विचारसरणीतून महाराष्ट्रावर हल्ले होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

हेही वाचा – BJP: अमित शहा खरे की फडणवीस; पक्ष फुटीवर भाजपा नेत्यांची वेगवेगळी विधाने