नीचपणाची हद्द पार करून…, चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना चोर…

Chitra Wagh target to Sanjay Raut | भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे. काल रात्री उशीरा ट्वीट करत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र डागलं.

sanjay raut chitra wagh and uddhav thackeray
प्रातिनिधिक छायाचित्र

Chitra Wagh target to Sanjay Raut | मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बनावट शिवसेना असा उल्लेख करीत हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या विधानाचे बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत तीव्र पडसाद उमटले. यावरून सभागृहाबाहेरही गदारोळ झाला. भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनीही संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे. काल रात्री उशीरा ट्वीट करत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र डागलं.

हेही वाचा – चोरमंडळावरून गदारोळ! संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल

चित्रा वाघ म्हणाल्या की, “संजय राऊत तुमच्या जिभेला हाड नाहीये हे आतापर्यंत सबंध महाराष्ट्रालाच कळलंय. आतापर्यंत व्यक्तीच्या नावाने शिव्या घालत होता पण आता नीचपणाची हद्द पार करून लोकशाहीच्या पवित्र स्थळाला तुम्ही चोरमंडळ म्हणताय. तुमचे नेते ‘उद्धव ठाकरेंना चोर’ म्हणण्यापर्यंत खाली घसरला आहात.”


संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली. या प्रकरणाची २ दिवसांत चौकशी करून बुधवार ८ मार्च रोजी आपण पुढचा निर्णय जाहीर करू, असे त्यांनी घोषित केले. त्यानंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांना अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळ थांबत नसल्याने शेवटी राहुल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यामुळे पुढील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे शिवसेना, भाजप आमदारांचे डोळे लागले आहेत.

संजय राऊत यांनी बुधवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. बुधवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा विषय उपस्थित केला. संजय राऊत यांना सदस्यांना चोर म्हणण्याचा अधिकार कोणी दिला. आपण एकमेकांवर आरोप करू शकतो, पण चोर म्हणू शकतो का? हे कायदे मंडळ आहे. चोरांना पकडणारे मंडळ आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही तर महाराष्ट्रद्रोह आहे, असे सांगत शेलार यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली.

१५ जणांची हक्कभंग समिती जाहीर

आतापर्यंत हक्कभंग समितीच अस्तित्वात नसल्याने संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ जणांची समिती स्थापन केली. या समितीत राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते-पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल या आमदारांचा समावेश आहे. राहुल कुल या समितीचे अध्यक्ष असतील.