(Chitra Wagh Vs Aaditya Thackeray) मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांना राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर लाडक्या अपात्र बहिणींची संख्या भाजपा सरकार वाढवणार आहे. अपात्रतेनंतर त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतील आणि ही योजना बंद करतील, असा दावा माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपले राजकीय भविष्य धोक्यात आले आहे, म्हणून आमदार आदित्य ठाकरे यांनी ज्योतिषी होण्याचे ठरवलेले दिसत आहे. म्हणजे खराखुरा ज्योतिषी नाही पण भामटा ज्योतिषी आहे. या भामट्या ज्योतिषाने लाडकी बहीण योजना बंद होणार असे भविष्य वर्तवले आहे. इतकेच नाही तर योजना बंद होण्याची कारणेही सांगितली. अर्थातच, याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, असे आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांना आपलं राजकीय भविष्य धोक्यात म्हणून त्यांनी ज्योतिषी होण्याचं ठरवलेलं दिसतंय. म्हणजे खरा खुरा ज्योतिषी नाही पण भामटा ज्योतिषी….
या भामट्या ज्योतिषाने लाडकी बहिण योजना बंद होणार असं भविष्य वर्तवलं इतकंच नाही तर योजना बंद होण्याची…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 22, 2025
यापुढे आदित्य ठाकरे आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष मिळून लाडकी बहीण योजनेबाबत तसेच आमच्या लाडक्या देवाभाऊंबाबत अपप्रचार सुरू करतील आणि मागून री ओढायला टोळधाड येईलच. आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुखांनी सुरूवात केलीच आहे. पण लक्षात ठेवा महाराष्ट्रातील समस्त लाडक्या बहिणींना त्यांच्या सख्ख्या आणि सावत्र भावांमधला फरक स्पष्ट कळाला आहे, असेही त्यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. पण तेवढे पैसे देण्यास सुरुवात केली आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. ज्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे आहेत, अशा अपात्र बहिणींची यादी हे सरकार महापालिका निवडणुकीनंतर वाढवेल आणि नंतर ही योजना बंद करतील, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केली होती. (Chitra Wagh Vs Aaditya Thackeray : Chitra Wagh’s reply to Aditya Thackeray on Ladki Bahin Yojana)