बेलापूर-पेंधर मेट्रो सर्वाधिक गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी धावणार
CIDCO announce new time table in navi mumbai metro
नवी मुंबई : सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक-१ बेलापूर ते पेंधर धावणार्या नवी मुंबई मेट्रोचा फायदा बेलापूर, तळोजा ते खारघरवासियांना होत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता सिडको प्रशासनाने येत्या सोमवार २० जानेवारीपासून मेट्रोच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्यावेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेर्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर ही सेवा सुरु केली आहे. लोकांच्या सोयीसाठी ही मेट्रो कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मेट्रो सेवा सुरु झाली. सीबीडी बेलापूर परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोने ७ सप्टेंबरपासून ३३ टक्क्यांपर्यंत तिकीटाचे दरही कमी केले आहेत.
सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणार्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेर्यांचा लाभ व्हावा याकरिता सदर मार्गावर २० जानेवारीपासून मेट्रो फेर्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बेलापूर आणि पेंधर स्थानकांतून सकाळी ६ वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. बेलापूर येथून रात्री २२ वाजता व पेंधर येथून रात्री २१.४५ वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी ७.३० ते १० आणि सायंकाळी ५.३० ते ८ तर पेंधर येथून सकाळी ७ ते ९.३० आणि सायंकाळी ५ ते ७.३० दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर १५ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
११ स्थानके; आरामदायी प्रवास वेगवान, पर्यावरण अनुकुल आणि आरामदायी प्रवासासाठी नवी मुंबईकरांना २०२३ मध्ये दिवाळीची भेट सिडकोने दिली आहे.मेट्रो सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. बेलापूर, आरबीआय कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेंट्रल पार्क, पेठपाडा, अमनदूत, पेठाली तळोजा, पेंधर, अशी मेट्रो मार्गात ११ स्थानके आहेत.