नवी मुंबई : सिडकोकडून दोन महिन्यांपूर्वी वाशी, खारघर, तळोजा भागातील घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सिडकोने घरांची किंमत जाहीर केली नव्हती. त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी अनेक अर्जदारांनी फॉर्म भरले. पण आता नव्याने समोर आलेल्या या माहितीनुसार, सिडकोच्या या घरांची किंमत 70 लाखांच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. वाशीतील घरांच्या किंमती थेट 75 ते 80 लाखांच्या घरात आहेत. तर खारघरमधील घर 1 कोटीच्या वर जाणार आहे. खासगी बिल्डरांप्रमाणे सिडको घरांच्या किंमती लावत असून सिडकोकडून फसवणूक केल्याचे आता अर्जदारांकडून सांगण्यात येत आहे. (CIDCO cheated us, serious allegations of applicants on house prices)
सिडकोने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आतापर्यंत सव्वालाखांच्या वर लोकांनी घरांसाठी अर्ज भरले आहेत. ज्यामुळे सिडकोकडे मोठी रक्कम जमा झाली आहे. तर, अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या आयटी रिटर्न, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल आदी कागदपत्रांसाठी पाच हजारांपेक्षा अधिकचा खर्च आल्याने हा खर्च सुद्धा फुकट गेल्याची माहिती अर्जदारांनी दिली आहे. तर सिडकोने घरांची जाहिरात प्रसिद्ध करताना घरांच्या किंमतीबाबतची कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे नागरिकांनीही सिडको नेहमीप्रमाणे दर ठेवेल या आशेने अर्ज भरले. परंतु, सामान्य नागरिकांना ही घरे परवडणारी नसल्याची भावना अर्जदारांनी व्यक्त केली आहे.
सिडकोने अगोदर किमती जाहीर करायला हव्या होत्या. लोकांनी त्यांच्या उत्पन्नानुसार इथे परवडत असेल तर अर्ज केला असता. इतका दर द्यायचा असेल तर सिडको ऐवजी दुसरा विचार केला होता. सिडकोकडून वारंवार वाढवण्यात आलेल्या तारखांवरून देखील नाराजी व्यक्त केली. कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी देखील अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सिडकोने दर कमी करावेत, असे मत एका अर्जदाराकडून व्यक्त करण्यात आले आहे. तर, एखादा व्यक्ती 50 हजार रुपये दरमहा कमवत असेल तर सगळे पैसे त्यामध्येच जाऊ शकतात. घरखर्चासाठी देखील पैसे राहणार नाहीत. या किमतीत बाहेर चांगले घर, चांगले ठिकाण भेटेल. फसवणूक झालीय, पैसे परत करा किंवा किमती कमी करा, असे म्हणत एका अर्जदाराने सिडकोविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत गोंधळ उडाल्यानंतर आता याबाबत आता सामाजिक न्याय मंत्री तसेच सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सिडकोने लॉटरी काढलेली त्यात लोकेशन आहेत. काही प्राईम आहेत, काही लोकेशन हे स्टेशन जवळील आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत. काही ठिकाणी किंमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ. पण आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही, यासंदर्भात वाटले तर फेरविचार करू. बिल्डर हा एरीया बिल्टअप एरिया देतो आम्ही कार्पेट एरिया देतो, असे संजय शिरसाट यांच्याकडून सांगण्यात आले आहे.