गणेशोत्सवाचा मुहूर्त! सिडकोकडून स्वस्त घरांसाठी सोडत जाहीर

नवी मुंबई – मुंबईतीली घरांच्या किंमतीत गगनाला भिडलेल्या असताना आजूबाजूच्या शहरांतही घरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य नोकरदार वर्गाला हक्काचे घर विकत घेणे स्वप्नवत राहिले आहे. मात्र, सिडकोने सामान्य नोकरदार वर्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मोठी घोषणा केली आहे. सिडकोने सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंडासाठी मेगा लॉटरीची सोडत जाहीर केली आहे.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास २५ हजार घरे सिडकोने विकली आहेत. सिडको घरांच्या किंमती आवाक्यात असल्याने आर्थिक दुर्बल घटकासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. सामान्य लोकांना घर घेणे सोपे व्हावे याकरता सिडकोकडून सोडत जाहीर केली जाते. कोरोना काळात बांधकाम साहित्य महाग झाल्याने घरेही महागली होती. त्यामुळे सामान्य नोकरदारवर्ग स्वतःचं हक्काचं घर घेऊ शकत नव्हता. सामान्य नागरिकांना अल्प दरांत त्यांचं स्वप्नाचं आणि हक्काच घर मिळावं याकरता सिडको आणि म्हाडाकडून सोडत जाहीर केली जाते. यातून अनेक लोकांचं स्वप्न साकार होतात.

सिडकोने गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत ४१५८ सदनिका, २४५ दुकाने आणि ६ मोठ्या भूखंडासाठी आज सोडत जाहीर केली आहे. याबाबत आज बुधवारी जाहीरात निघणार आहे, तर उद्या गुरुवारपासून ग्राहकांना अर्ज करता येणार आहे.

द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील ४१५८ घरे या सोडतीत जाहीर करण्यात येणार आहेत. यापैकी ४०३ घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता राखीव आहेत. उर्वरित ३७४५  घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

म्हाडाकडूनही खुशखबर

सिडकोने सोडत जाहीर केलेली असताना म्हाडानेही मुंबईत ४ हजारांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीत ही सोडत जाहीर होणार आहे. त्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. म्हाडाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र ती लवकरच होण्याची शक्यता आहे.