मुंबई : सिडकोकडून दोन महिन्यांपूर्वी वाशी, खारघर, तळोजा भागातील घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सिडकोने घरांची किंमत जाहीर केली नव्हती. त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी अनेक अर्जदारांनी फॉर्म भरले. पण काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, या घरांची किंमत 70 लाखांच्या वर आहे. ज्यामुळे सिडकोने आमची फसवणूक केल्याची भावना अर्जदारांनी व्यक्त केली. ज्यानंतर सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यात येतील, असे म्हटले होते. पण गुरुवारी (ता. 16 जानेवारी) शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर आता सिडकोने घरांच्या किंमती कमी होणार नसल्याचे सांगितले आहे. (CIDCO House prices will not come down, decision as soon as Sanjay Shirsat resigns)
सिडकोने दोन महिन्यांपूर्वी 26 हजार घरांची सोडत जाहीर केली. परंतु, त्यावेळी घरांच्या किंमती जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. पण काही दिवसांपूर्वी सिडकोने घरांच्या किंमती जाहीर केल्या. ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे ज्या अर्जदारांनी घरांसाठी फॉर्म भरले होते, त्यांच्याकडून घरांच्या किंमतींबाबत संताप व्यक्त करण्यात आला. सिडकोने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे घर’ या योजनेअंतर्गत 26 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या किंमती कमी करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले होते. मात्र, शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावरून पायउतार होताच सिडकोने जाहीर केलेले दर कमी करणार नसल्याचे संकेत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिले आहेत.
हेही वाचा… NCP : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार घरवापसी
सिडकोने घरांच्या किंमती रेडीरेकनरनुसार ठरवल्या आहेत. तर सिडको या घरांमध्ये अत्याधुनिक सुविधा देत असल्याने घरांच्या किंमती योग्य असल्याचे स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आले आहे. त्यामुळे, सिकडोच्या घरांच्या किंमती आता कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यामुळे आता अर्जदारांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळे सिडकोने जाहीर केल्यानुसार, वाशीतील घरांच्या किंमती थेट 75 ते 80 लाखांच्या घरात तर खारघरमधील घर 1 कोटीच्या वर जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सिडकोने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आतापर्यंत सव्वालाखांच्या वर लोकांनी घरांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे हे अर्जदार आता काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले…
राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. मात्र, मंत्रिमंडळात नियुक्ती होऊन महिना उलटून गेला तरी मंत्री शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. सिडकोचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने मंत्री बनल्यावर त्याचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, सामाजिक न्याय खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरही संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते. त्यानुसार, नगरविकास विभागाने गुरुवारी (ता. 16 जानेवारी) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.