बापरे ! महाराष्ट्रातील नागरिक वर्षाला पितात कोट्यवधी रुपयांची दारू

पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी वर्ध्यात सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नागरिक वर्षाला किती कोटींची दारू पितात? याबाबतचा खुलासा केला आहे. डॉ. बंग यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागरिक तब्बल दोन कोटी रुपयांची दारू हे दरवर्षी पितात, ज्यामुळे हे राज्य महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र असा प्रश्न आता पडला आहे.

वर्धा जिल्ह्यात अखिल 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज, रविवारी समारोप झाला. या संमेलनात मूळचे वर्ध्याचे रहिवासी असलेले ज्येष्ठ समाजसेवक, गडचिरोलीमध्ये व्यसनमुक्ती चळवळ राबवणारे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ, ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर व महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी डॉ. बंग यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी डॉ. बंग यांनी राज्यात दारूबंदीचा कसा बोजवारा उडाला आहे आणि दारूबंदीसाठी नेमकी कशाची गरज आहे, यावर आपले मत व्यक्त केले.

डॉ. बंग यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रात वर्धा आणि गडचिरोली या दोनच जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. गडचिरोलीपेक्षा वर्ध्याच्या दारुबंदीवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. समाजात दारू हा प्रश्न आहे की, दारूबंदी हा प्रश्न आहे, हे आधी ठरवले गेले पाहिजे. ज्यांना दारूच्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष जाऊ नये असे वाटते, ते दारूबंदीचा बागुलबुवा उभा करतात आणि मूळ प्रश्नापासून समाजाचे दुर्लक्ष करतात.’

या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील लोक दरवर्षाला तब्बल दोन कोटी रुपयांची दारू पितात, अशी धक्कादायक माहिती दिली. शासकीय आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तपशीलावरून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून हा निष्कर्ष काढल्याचे यावेळी डॉ. बंग यांनी सांगितले. त्यामुळे हे महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र आहे, असा प्रश्न पडत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. राज्याची लोकशाही दारूने भ्रष्ट झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे दारूच्या पैशांवर चालते. महाराष्ट्राच्या निवडणुका या दारूच्या पैशांवर आणि नशेवर जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान

या प्रकट मुलाखतीमध्ये डॉ. बंग यांनी महत्वपूर्ण माहिती देताना सांगितले की, जगामध्ये मृत्यू आणि विकलांगतेची जेवढी काही कारणं आहेत, या सर्व कारणांमध्ये दारू पिणे आणि तंबाखूचे सेवन करणे हे महत्त्वाचे कारण आहे. दारू आणि तंबाखू हे सुख आणि गंमत देणारे पदार्थ राहिलेले नसून ते आधुनिक प्लेग आणि कॉलरा असल्याचेही यावेळी डॉ. बंग यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप शाखेने एक निवेदन जारी करून समाजात दारूवर नियंत्रण असले पाहिजे. दारू पिण्याचे प्रमाण शून्य असले पाहिजे असे सांगितले आहे, अशी माहिती यावेळी डॉ. बंग यांच्याकडून मुलाखतीमध्ये देण्यात आली आहे.