सिव्हिलमध्ये रुग्णांचे अतोनात हाल; शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम

नाशिक : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी (दि.१४) दोन ते तीन तास केसपेपर काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. तर बुधवारी (दि.१५) पहाटेपासून रुग्णांची गर्दी झाली होती. मात्र, कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचार्‍यांचा राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले असून, आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. संपामध्ये जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉय, नर्सेस आणि इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील कामे खोळंबली आहेत. याचा फटका रुग्णांसह नातेवाईकांना बसत आहे. बुधवारी (दि.१५) पहाटेपासून जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल 2-3 तास रांगेत उभे राहून केस पेपर मिळाले नाहीत, डॉक्टर नाही म्हणून उपचार झाले नाहीत. त्यामुळे आज पहाटेपासूनच रुग्ण आणि नातेवाईक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाबाहेर येऊन बसले होते.

आता उपचार कोण करणार

मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर इथून नाशिकला आलो. पहाटे नाशिकला पोहोचलो. जिल्हा रुग्णालयात आलो. मात्र, रुग्णालयात एकही कर्मचारी दिसला नाही. त्यामुळे उपचार मिळतील की नाही असा प्रश्न पडला आहे. संप असल्याचे माहिती असते तर आलोच नसतो, असे प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या वयोवृद्ध रुग्णाने माध्यमांशी बोलताना दिली.