घरमहाराष्ट्रगृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्यासमोरच सिव्हिल इंजिनिअरला बेदम मारहाण

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्यासमोरच सिव्हिल इंजिनिअरला बेदम मारहाण

Subscribe

फेसबुकवरील टीका पडली महाग

फेसबुकवर टीका केल्याच्या कारणावरून एका सिव्हिल इंजिनिअरला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक असलेल्या पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री आव्हाड यांच्या बंगल्यात घडला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मात्र पोलीस दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या तरुणाने केला आहे. अनंत करमुसे (४०) असे मारहाण करण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनिअरचे नाव आहे. करमुसे हे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील उन्नती वुड्स आनंद नगर येथे कुटुंबियांसोबत राहतात. करमुसे यांनी वर्तकनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी गणवेशातील दोन पोलीस शिपाई आले. त्यांनी करमुसे यांना एका गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस ठाण्यात बोलावले असे सांगून त्यांना एका खाजगी मोटारीत बसवून थेट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात नेले.

- Advertisement -

बंगल्यात अगोदरच हजर असलेल्या साध्या वेशातील तसेच गणवेशातील पोलीस आणि १० ते १२ अनोळखी इसमांनी पोलीस दंडुक्याने करमुसे यांना बेदम मारहाण केली. साहेबांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकतो का, असे बोलून १२ ते १५ जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. करमुसे यांनी माफी मागून मी पोस्ट डिलीट करतो असे सांगूनही त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली असे करमुसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीनंतर करमुसे यांना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या समोर हजर करण्यात आले. करमुसे यांनी मंत्री आव्हाड यांच्यासमोर माफी मागितली व यापुढे अशी चूक होणार नाही, असे सांगितले. काही वेळाने वर्तकनगर पोलीस आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर आले. त्यांनी अनंत करमुसे यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले असल्याचे करमुसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

वर्तकनगर पोलिसांनी करमुसे यांची तक्रार दाखल करून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार अनंत करमुसे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला असून अधिक चौकशीसाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -