घरमहाराष्ट्रपुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी; संजय राऊतांचा इशारा, अजित दादांचं सूचक वक्तव्य

पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी; संजय राऊतांचा इशारा, अजित दादांचं सूचक वक्तव्य

Subscribe

खेडमधील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावरून शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते सजय राऊत यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे घाणेरडं राजकारण करत आहेत. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच राऊत यांनी दिला. दरम्यान, आज देखील संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

दिलीप मोहिते पाटील प्रकरण तापलं आहे असं चित्र आहे. संजय राऊत यांनी खेड येथे प्रत्यक्ष भेट दिली व त्या ठिकाणी पत्रकारपरिषद घेत, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना देखील या मुद्यावरून संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिल्याचे दिसून आले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यापैकी कोणावरही आम्ही या संदर्भातील खापर फोडलेलं नाही. हा पूर्णपणे खेड विधानसभा मतदार संघाचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते त्यांनी घडवून आणलेला विषय आहे. मात्र त्यांनी जरी घडवून आणलेला हा विषय होता, तरी या जिल्ह्याचे या भागाचे महत्वाचे नेते म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरुन हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करु नका, शिवसेना उत्तर देईल, असा इशारा देखील दिला.

आम्हाला संधी पण मिळेल…

“आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा करून कल्पना दिली होती. की, असं काही घडत आहे व आपण त्यामध्ये लक्ष घालावं. मी काल देखील सांगितलं, की स्थानिक पातळीवर राजकारण होत असतं कुरघोड्या करत असतात, पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो. हे ठरवायला हवं. अशी संधी आम्हालाही मिळेल पण आम्ही ते करणार नाही. जर आम्हाला अशी संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या संदर्भात त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा अजित पवार यांच्याशी बोलू व सांगू की तुमची लोकं आमच्यापर्यंत आले आहेत व त्यांना तुमचा पक्ष सोडायचा आहे आणि आमच्याकडे यायचं आहे. तुम्ही तुमच्या लोकांना सांगा. हे आम्ही सांगू,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांचं सूचक वक्तव्य

दिलीप मोहिते पाटील प्रकारणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीमध्ये सगळे जण एकोप्याने राहत असून, जिथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी उमेदवार होते तिथे कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले.

 नेमका वाद काय?

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे ८ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलेय. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला ९ महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झालीय. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलेय. सर्व पक्षीय १४ पैकी ११ सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच संजय राऊत यांनी तसा आरोप देखील केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -