जितेंद्र नवलानींची चौकशी बंद; नव्या सरकारचा संजय राऊत यांना झटका

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसाठी कथित खंडणी वसूल करीत असल्याप्रकरणी जितेंद्र नवलानी यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशी सुरू होती. मात्र नव्या शिंदे सरकारने ही चौकशी बंद केली असून तशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना झटका बसला आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेत नवलानींवर आरोप केले होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी मार्च महिन्यात शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ईडीचे अधिकारी आणि भाजप नेते भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांचे जे खंडणी वसुलीचे रॅकेट आहे, त्यामध्ये मुंबईचे उद्योगपती जितेंद्र नवलानी प्रमुख असून त्यांनी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून खंडणी उकळली आहे, असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता.

हेही वाचा – कोकणात अमित ठाकरे – नितेश राणे भेट, राजकीय चर्चांना उधाण

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या तक्रारीनंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकारने या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी सुरू केली होती.
मात्र एसआयटीने काल मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) पुरेशा पुराव्याअभावी तपास बंद करत असल्याचे सांगत जितेंद्र नवलानी यांना क्लिन चीट दिली. न्यायालयाने देखील याला मंजुरी देत नवलानी यांच्याविरुद्धची प्राथमिक चौकशी रद्द करून याचिका निकाल काढली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय संजय राऊत आणि शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देणे योग्यच, मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाम मत