घरताज्या घडामोडीCoronavirus: राजकीय नेते धास्तावले, मंत्रालयासह राजकीय पक्षाच्या कार्यालयातही शुकशुकाट

Coronavirus: राजकीय नेते धास्तावले, मंत्रालयासह राजकीय पक्षाच्या कार्यालयातही शुकशुकाट

Subscribe

भाजप कार्यालयाची वेळही बदलली   मंत्रालयातही मंत्री फिरकेनात  

राज्यात सध्या करोनाचे सावट असून करोनाच्या रुग्णांची संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. करोनामुळे मुंबईमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यात भितीचे वातावरण पसरले असून, सर्वसामन्य नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारने दिलेला हा सल्ला आता सर्वच पक्षातील राजकीय नेते देखील पाळताना दिसत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये देखील रोज येणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असे आवाहन आता राजकीय पक्षाकडून केले जात आहे. एवढेच नाही तर मंत्रालयात देखील दररोज येणाऱ्यांचे प्रवेश पास बंद करण्यात आले आहेत.

मंत्रालयातही मंत्री फिरकेनात  

विशेष बाब म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात देखील मंत्र्यांच्या दालनात शुकशुकाट पहायला मिळत असून, काही ठराविक मंत्री वगळता बरेचशे मंत्री हे आपआपल्या मतदारसंघातच राहणे पसंत करत आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील महत्त्वाच्या बैठका मंत्रालयात न घेता सह्याद्री किंवा वर्षावर घेत आहेत. तर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपला जनता दरबार देखील डिजीटल घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सध्या अशोक चव्हाण यांच्या कार्यालयात लोकांची ऑनलाईन निवेदने आली असून, यातील काही जणांशी ते गुरुवारी नांदेड येथून ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: केरळ उभारणार करोना केअर होम्स

भाजप कार्यालयाची वेळही बदलली

करोनाच्या पार्श्वभुमीवर नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाची वेळ देखील बदलण्यात आली असून, २२ मार्चपर्यंत फक्त कार्यालयीन कामकाजासाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयात राज्याच्या ग्रामीण भागातून दररोज असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या कामासाठी येतात. पक्षाचे महत्वाचे नेते कार्यालयात उपस्थित असले तर प्रचंड गर्दी उसळते. गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -