मेळघाट दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने तीघांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे.

shinde_melghat

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्या  व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत.

काय घडली घटना –

जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

गढूळ पाणी पिल्यामुळे अनेक आजार –

मेळघाटात पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. मेळघाट, चिखलधरा लगतच्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, लोकप्रतीनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. नागरीकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असून हे पाणी पिल्यामुळे गावात अनेकांना खोकला, पोट दुखी, सारखे आजार झाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारवर नवनीत राणांचा आरोप –

गावाबाहेरच्या विहिरीतील घाण पाणी पिल्याने लोके आजारी पडले आहेत. त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचा वीज पुरवठा कापल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मागच्या सरकारने आदेश दिल्याने वीज पुरवठा 15 दिवस आधी कापण्यात आला. ज्या विभागाच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. उघड्या विहिरीवरून हे लोक अस्वच्छ पाणी भरत होते तेव्हा प्रशासन काय करत होते याचे उत्तर द्यावे लागेल. येवढी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.