Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र उद्योजकांनो, लॉकडाऊन आणि नॉकडाऊनही नको

उद्योजकांनो, लॉकडाऊन आणि नॉकडाऊनही नको

कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांसोबत संवाद

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकट काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशासमोर ठेवायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योजकांच्या बैठकीत सांगितले. कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. निर्बंध शिथिल करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा किती कडक करायचे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी बोलताना त्यांनी उद्योजकांकडून सरकारला सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवली. मुंबईत ज्या पध्दतीने कोरोना साथीची परिस्थिती हाताळली गेली त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. दीड वर्षात कोरोना परिस्थितीला हातळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याचदरम्यान कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, नाहीतर कोरोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले. आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आणि कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार आणि कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात. तसेच वैद्यकीय आणि इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, आणि सीआयआयचे माजी अध्यक्ष उदय कोटक, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर, सीआयआयचे नियुक्त अध्यक्ष आणि बजाज फिनसर्वचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष बी. थियागराजन, पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, लार्सन आणि टुब्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन सुब्रमण्यम, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिष शाह, आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका, टाटा सन्स लिमिटेडचे इन्फास्ट्रक्चर, डिफेंस आणि एरोस्पेसचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल, हिरानंदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उद्योजक रमेश शाह, नौशाद फोर्ब्स, बोमन इराणी, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, सुलज्जा फिरोदिया मोटवानी आदी उद्योजक उपस्थित होते.

- Advertisement -