Homeमहाराष्ट्रCM Fadanvis : इस्रोच्या 'स्पॅडेक्स PSLV-C60' यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले...

CM Fadanvis : इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

Subscribe

मुंबई : “नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पॅडेक्स मिशन अंतर्गत सोमवारी (30 डिसेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री 9.58 वाजता 2 उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. यामुळे आता भारत हा अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या जगातील निवडक देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. (CM Devendra Fadanvis congratulated ISRO on isro pslv c60 launched)

हेही वाचा : Devendra Fadnavis : महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आहेत की, “या मोहिमेमुळे भारताला अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यान ‘डॉकिंग’ ‘अनडॉकिंग’ करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरणार आहे, याचाही भारतीयांना सार्थ अभिमान आहे.”

तसेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अवकाश विस्तारणारी ही कामगिरी आहे. यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या शिरपेचात ‘इस्रो’ने मानाचा तुरा रोवला आहे. या मोहिमेत सहभागी इस्रोचे वैज्ञानिक, अभियंते तसेच भारतीय अंतराळ विज्ञान विभागातील सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही या मोहिमेत सुरू राहणाऱ्या विविध प्रयोग, संशोधन प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा,” असे कौतुक त्यांनी केले आहे.

स्पॅडेक्स ही इस्रोची 2024 मधील शेवटची मोहीम होती. स्पॅडेक्स मोहिमेचा उद्देश अवकाशयानांना डॉक (एका यानाला दुसर्‍या यानाशी जोडणे) आणि अनडॉक (अंतराळात जोडलेले दोन यान वेगळे करणे) करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये 2 लहान अंतराळ यानांचा समावेश आहे. प्रत्येक यानाचे वजन अंदाजे 220 किलो आहे. पृथ्वीपासून 470 किलोमीटर अंतरावरील कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हा प्रयोग केला गेला. यामध्ये एक चेझर (एसडीएक्स 01) नावाचा उपग्रह आहे आणि दुसरा टार्गेट (एसडीएस 02) नावाचा उपग्रह आहे.


Edited by Abhijeet Jadhav