मुंबई : मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, सर्वांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (CM Devendra Fadnavis On Sanjay Raut Statement)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेडीकल कॉलेज आणि आयजीएमसी या दोन मेडिकल कॉलेजमधील कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर आणि महाविकास आघाडी टीकण्यावर भाष्य केलं. त्यानुसार, “माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं की त्यांची आघाडी राहील की तुटेल, याकडे आमचं लक्षं नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये जनतेचा आम्हाला आशीर्वाद राहील”, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.