घरताज्या घडामोडीआम्ही सारे सावरकर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेने बदलला डीपी

आम्ही सारे सावरकर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेने बदलला डीपी

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ट्विटरचा डीपी बदलला आहे. आम्ही सारे सावरकर असा डीपी, प्रोफाईल, मुख्यमंत्र्यांसह सर्व शिवसेना आमदारांनी ठेवले आहेत. एकीकडे काँग्रेसने डरो मत हा डीपी, प्रोफाईल ठेवला असून दुसरीकडे शिवसेनेने आम्ही सारे सावरकर असा डीपी ठेवला आहे. तर भाजपची सध्या बघ्याची भूमिका आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर देशभरातील अनेक नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडल आणि पक्षाच्या नेत्यांनी आपले डीपी बदलले आहेत. यामध्ये राहुल गांधींचा फोटो दिसत असून त्यावर डरो मत असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावच्या सभेत राहुल गांधींचे कान टोचले आहेत. ही लोकशाहीची लढाई आहे. पण मी राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांच्या वाड्यात मी लहानपणी गेलो होतो. सावरकरांचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. सावरकरांनी एकप्रकारे बलिदान दिलंय. त्यांनी १४ वर्ष यातना सोसल्या. आपण एकत्र आलोय ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, असं उद्धव ठाकरे सभेत म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार राहुल गांधी यांच्याकडून अपमान होत आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या स्वातंत्र्यावीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हे आंदोलन करत असताना काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे या देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सावरकर गौरव यात्रेची घोषणा

शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही नेणार आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा जो वारंवार अपमान केला आहे, त्याचा आम्ही या यात्रेतून निषेध करू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राहुल गांधींना शिक्षा कशासाठी?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?, असा खोचक प्रश्न उपस्थित केला होता. मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असे राहुल गांधींनी म्हटले होते. परंतु त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेत आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात सुरत न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली. मात्र, उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधींना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


हेही वाचा : राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -