Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी लक्षवेधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडली. यावेळी हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला येलो ॲलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी काहीही विधाने करुन आकलेचे तारे तोडत असल्याचे सांगून कृषी मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात दि.5,6 व 7 मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु झालेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून 20 मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर 11 जिल्ह्यांना ऑरेज ॲलर्ट देण्यात आलेला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन आकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरु करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
हेही वाचा – अवकाळी अटळ, दूरदृष्टीची गरज!
“आपल्याकडे दुष्काळ, अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती. परंतु, अवकाळीबाबतचे निकष नव्हते.पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की, अवकाळी पावसाचीही नुकसान भरपाई देण्यात यावी. एनडीआरएफच्या नियमांच्या बदलांची वाट न पाहता एसडीआरएफच्या नियमांत बदल करून शेतकऱ्यांना मदत केली आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
नांदेड, नाशिकमध्ये पंचनामे सुरू आहेत. तेथील अहवाल लवकरच प्राप्त होतील. आधीचे नुकसान आणि कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलो आहोत. नियम-निकष डावलून पूर्वीही मदत केली आणि आजही मदत करत आहोत. शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला दिले.