MPSC च्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला; म्हणाले, विद्यार्थ्यांआडून राजकारण…

Eknath Shinde counter to Oppositions Leader | महाराष्ट्र लोकसेवा आयोागने निर्णय जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Eknath Shinde counter to Oppositions Leader | पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सुधारित परीक्षा योजना आणि नवा अभ्यासक्रम २०२५ (MPSC New Pattern 2025) पासून लागू करण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना माहितीही दिली. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी याबाबत मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश आलं असून याचं श्रेय घेणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. तसंच, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण सुरू होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोागने निर्णय जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासनदेखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं. एकंदरित जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावर आम्ही एमपीएसीला विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याबाबत मी धन्यवाद देतो. यामध्ये आम्हाला कोणतंही राजकीय श्रेय घ्यायचं नाही. पण काही लोक विद्यार्थ्यांआडून राजकीय त्याला रंग देण्याचा प्रयत्न करत होते. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याचे खापर नव्या सरकारवर फोडण्यात आले. तरीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक निर्णय घेतला.

हेही वाचा MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळ गाठले. यावेळी त्यांनी रात्रीच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर, आज युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जाणार होते. परंतु, त्यांच्या भेटीआधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला निर्णय जाहीर केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी येणार आणि कोणी जाणार म्हणून निर्णय घेतला जात नाही. विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे.