घर महाराष्ट्र मराठा समाजाबाबत गळा काढणारे तेच आणि घोटणारेही तेच, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना सुनावले

मराठा समाजाबाबत गळा काढणारे तेच आणि घोटणारेही तेच, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना सुनावले

Subscribe

जालन्याच्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फैलावर घेतले. जे जालन्यात झालेल्या घटनेवरून गळा काढत आहेत, तेच मराठा आंदोलकांचे गळा घोटत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी 1 सप्टेंबरला पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून घटनेच्या 3 दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जालन्याच्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फैलावर घेतले. जे जालन्यात झालेल्या घटनेवरून गळा काढत आहेत, तेच मराठा आंदोलकांचे गळा घोटत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. (CM Eknath Shinde criticism of opposition who politicized the Jalna incident)

हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जे लोकं मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजपत आहे त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिले पाहिजे. संभाजीराजे, उदयनराजे यांनी आंदोलकाच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. बाकी लोकं सरकारला बदनाम करण्याचे एककलमी कार्यक्रम करत होते. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही.

तसेच, विरोधकांकडून हे चुकीच्या पद्धतीने आरोप सुरू आहेत. सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आमच्या सरकारची स्थापना झाल्यापासूनच हा बदनामीचा प्रकार सुरू आहे. परंतु, तेदेखील (विरोधक) यापूर्वी राज्यकर्ते होते. अशा प्रकारचे आदेश दिले जातात का? यावर त्यांनी बोलावे. महाराष्ट्र अशांत करण्याचे काम कोणीही करू नये. अशा प्रकारचे आरोप करणे, यात राजकारण करणे हे चुकीचे आहे. मला सध्या यात राजकारण आणायचे नाही, असे म्हणत त्यांनी सांगितले की, जे जालन्यात झालेल्या घटनेवरून गळा काढत आहेत, तेच मराठा आंदोलकांचे गळा घोटत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -

तर, जी घटना घडली त्याबाबतीत एसपी सतीश जोशी यांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. नव्या अधिकाऱ्याने चार्ज घेतलेला आहे. याची सखोल चौकशी पोलीस महासंचालक करत आहेत. तसेच अॅडीशनल डीजी माहिती घेतील. पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून पूर्ण चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मराठा कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. तसेच, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेण्यात येतील, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -