रत्नागिरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा शेवटचा दिवस हा 18 नोव्हेंबर असणार आहे. त्याआधी सर्व पक्षांनी राज्यातील आत्तापर्यंत राहिलेल्या भागांमधील जनतेशी संवाद साधता यावा यासाठी जोर धरला आहे. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील दापोली येथे प्रचार सभा घेतली. महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in Dapoli Rally Maharashtra Election 2024)
हेही वाचा : Uddhav Thackeray : माझं सरकार पाडणं हा भाजपाचा सत्ता जिहाद; ठाकरेंचा गंभीर आरोप
एका प्रचार सभेत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 10 दिवस थांबा, तुम्हाला पण तुरुंगात टाकतो, अशा शब्दात टीका केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “तुम्ही कोणाला धमक्या देत आहात? मी कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही कोणासमोर तुरुंगात टाकण्याची भाषा वापरत आहात? तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका,” अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. “दापोलीची जमीन ही पवित्र आणि संपन्न आहे. याच भूमीत बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभा असून त्यांचा विजय पक्का आहे. 23 तारखेला गुलाल उधळत दिवाळी साजरी करायची आहे.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
“दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची आहे. 3.5 हजार कोटी रुपयांची विकास कामे आपल्या सरकारने इथे केली आहेत. या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही भेटीगाठी घेतल्या नाही, तर निधी कुठून येणार होता? 23 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. एवढे फटके वाजवा की त्याचा आवाज वांद्र्यापर्यंत पोहोचायला हवा. उद्धव ठाकरे मला तुरुंगात टाकणार? लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? याचा मुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा.” असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. “कोकण आणि शिवसेनेला कोणी वेगळे करू शकत नाही, बाहेरून काटेरी पण आतून गोड अशी कोकणातली माणसे आहेत. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, हे सरकार देणारे असून घेणारे नाही. आमची नियत साफ असून मतदान झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसेदेखील तुमच्या खात्यात येतील. कोणाला धमक्या देत आहात? आम्ही घाबरत नाही, तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतले. त्यामुळे त्यांची टांगा पलटी घोडे पसार अशी परिस्थिती झाली आहे.” असा टोला त्यांनी लगावला.