ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंनी १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, ही यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे यावर राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा – काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी जाहीर करा, शशी थरूर यांची मागणी

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी असताना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ आमदारांची नावे राज्यपालांना पाठवली होती. मात्र, या यादीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले नाही. दरम्यान, ही यादीच आता रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने १२ आमदारांची यादी पाठवणार आहेत.

हेही वाचा – फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे, बेरोजगारीवरून शिवसेनेची केंद्रावर उपहासात्मक टीका

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. २०२० मध्ये पाठवलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या यादीवर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार येताच आता यावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्तांतर होणार असल्याचं नियोजन सुरू असल्यानेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी सही केली नव्हती, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान, आता ही यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.