घरताज्या घडामोडीमुंबईत गोवरचा विळखा, संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पालिकेला निर्देश

मुंबईत गोवरचा विळखा, संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पालिकेला निर्देश

Subscribe

मुंबई –  गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे. तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.

- Advertisement -

गोवरचे आठ हॉटस्पॉट

शहर व उपनगरात आठ ठिकाणी गोवरचे ‘हॉटस्पॉट’ तयार झाले आहेत. यामध्ये, सर्वाधिक ४४ रुग्ण गोवंडी परिसरात आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ कुर्ला विभागात – २९, मालाड – १४, धारावी – १२, वडाळा, अँटॉप हिल विभाग – १२, वांद्रे -११, चेंबूर – ६ आणि भायखळा येथे ५ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर बाधित रुग्णांची संख्या व माहिती पाहता पूर्व उपनगरात सर्वाधिक – ७९, शहर भागात -२९ तर पश्चिम उपनगरात – २५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आरोग्य खाते गोवरला हद्दपार करण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहे.

- Advertisement -

वास्तविक, मुंबईत गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. गोवंडी परिसरात १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १,२६१ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत आतापर्यंत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकट्या गोवंडीत ४४ रुग्ण आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५९७२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन सदस्य असलेली टीम विभागवार भेट देत आहे.

मुंबईत गोवरने आतापर्यंत ७ मुलांचा संशयित मृत्यू

मुंबई शहर व उपनगरात ८ ठिकाणी सध्या गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत गोवर बाधित ७ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयातील दाखल ६१ रुग्णांपैकी पाच रुग्णांवर अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरू आहेत. तर, एक रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहे.

मात्र ज्या सात संशयित रुग्णांचा मृत्यू झाला तो नेमका गोवरमुळे की आणखी कोणत्या कारणामुळे याची माहिती येत्या दोन-तीन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यावर समोर येईल, अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.


हेही वाचा : संघ व भाजपा आदिवासींना ‘आदिवासी’ मानत नाहीत, राहुल गांधी यांची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -