कामाख्या देवी जागृत.., गुवाहाटी विमानतळावर पाऊल ठेवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

cm eknath shinde criticizes uddhav thackeray sanjay raut and thackeray group guwahati kamakhya devi darshan assam

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांसोबत आणि संपूर्ण कुटुंबियांसमवेत गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडू दे, असा नवस कामाख्या देवीला केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुवाहाटी विमानतळावर पोहोचताच त्यांनी देवीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कामाख्या देवी जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. सरकार स्थापन झालं. सर्व सामान्य लोकांच्या मनातील सरकार स्थापन झालं. विरोधकांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. त्यांना काही कामं उरलेली नाहीयेत. आम्ही कामं करणारी लोकं आहोत. आम्ही श्रद्धेने आणि भक्तीभावाने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. त्यामुळे त्यांना टीका करु द्या आणि आम्ही काम करत राहु, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दर्शनाला आलोय. सर्वांच्या मनात दर्शनाला यायचं होतं. पूर्वी आलो होतो. तेव्हा धावपळ झाली होती. त्यामुळे पुन्हा दर्शनाला जाण्याची सर्वांची इच्छा होती. त्यानुसार आज निवांत आलो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आसाम सरकारने आमचं स्वागत केलं याचा आनंद आहे, समाधान आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याची संधी मिळाली. आजच आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत. संध्याकाळी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील वेळेस देखील त्यांनी आम्हाला मदत केली आणि आताही आम्हाला भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक, सोलापुरात पत्रकार परिषदेत तुफान