कसबा मतदारसंघातील ज्येष्ठ शिवसैनिकाला मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

कसबा विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव कोंडीबा ढवळे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना वैद्यकीय मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली.

गुलाबराव ढवळे हे सध्या मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. आज त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावरील संपूर्ण उपचारांची जबाबदारी देखील शिवसेनेच्या वतीने उचलण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच युवासेना सचिव किरण साळी आणि युवासेना शहरप्रमुख उमेश गिरमे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झालेला असताना दुसरीकडे पुण्यात पोटनिवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुण्यातील जनतेचा कौल आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिवसेना-भाजपा महायुती आणि ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार सभा घेतल्या आहेत.


हेही वाचा : जे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते आम्ही केलं, नामांतरावरून ठाकरेंची खोचक