मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेला दिवस आज उजाडला. महाराष्ट्राचे पुढील पाच वर्षांसाठी भाग्यविधाते कोण हे ठरवण्यासाठी आज महाराष्ट्राने मतदान केले. सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत महाराष्ट्रात 58.22 टक्के मतदान झाले. शेवटच्या एका तासाची आकडेवारी अजून समोर आलेली नाही. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईचा दौरा करत असताना आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदार संघाचा दौरा केला. येथील मतदारांसोबत त्यांनी संवाद साधला.
मतदान संपताना मुख्यमंत्री वरळीत…
मतदान संपण्यास शेवटचा एक तास उरला असताना, मुख्यमंत्री ठाण्याच्या दिशेने रवाना होतं होते. यावेळी त्यांनी आपला ताफा वरळीत वळवला. जवळपास अर्धा तासहून अधिक वेळ मुख्यमंत्री वरळीत होते. मुख्यमंत्र्याच्या वरळीतील या धावत्या भेटीने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाची चिंता वाढवली. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची लढत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्यासोबत आहे. शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यात जाऊन आवाहन दिलं होते. आदित्य ठाकरेंनी शिंदेंना त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचं आवाहन दिलं होते.
वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष
मुंबईत दोन ठाकरे निवडणूक लढत आहेत. आदित्य ठाकरे यांची ही दुसरी निवडणूक आहे, तर राज पुत्र अमित ठाकरे हे प्रथम विधानसभा लढवत आहेत. त्यांच्याविरोधातही शिंदे गटाचे उमेदवार आहेत. माहिमध्ये अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर तर वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच मनसेचे संदीप देशपांजडे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून अमोल आनंद निकाळजे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरा सामना हा आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवर यांच्यातच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेकडे विशेष लक्ष दिलं आहे. मात्र, या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणारे हे आपल्याला येत्या 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.
Edited by – Unmesh Khandale