घरठाणेराज ठाकरेंच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री मनसे कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केले एकनाथ...

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री मनसे कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केले एकनाथ शिंदेंचे स्वागत

Subscribe

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंची तोफ आज कोणावर धडाडणार, याची सर्वांनाच उत्सूकता लागून राहिली आहे. एकीकडे मुंबईत असे वातावरण असताना मनसेच्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे मनसेच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी शाल-श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

- Advertisement -

राज्यभरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी डोंबिवलीत देखील गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे. या शोभायात्रेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी हजेरी लावली. या शोभायात्रे दरम्यान मनसे आमदार राजू पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मनसेच्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. पाटील यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्रीही मनसे कार्यालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी अचानक मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात बराचवेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी कार्यालयाला भेट दिल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच कार्यालयात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, ही डोंबिवलीची राजकीय संस्कृती आहे. यामध्ये राजकारण आणू नका, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत वाढलेली जवळीक लपून राहिलेली नाही. स्वतः मुख्यमंत्री दोन वेळा राज ठाकरे यांचे निवासस्थाना शिवतीर्थावर गेले आहेत. तर राज ठाकरेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवास्थानी गेले होते. गणेशोत्सवा दरम्यानही राज यांनी मुख्यमंत्र्याचे निवासस्थान वर्षा येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण प्रसंगी देखील राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे होते. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठी आणि जवळीक ही आगामी नव्या राजकीय समीककरणाची पेरणीतर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

आज राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा आहे. या मेळाव्यात ते काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सूकता आहा. राज ठाकरे यांनीही मंगळवारी एका प्रकट मुलाखतीत उद्या मी काय बोलणार ते पाहाच, असे म्हणून विरोधक आणि समर्थक सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर दुसरीकडे मनसे कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही भेट राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.


हेही वाचा : राज ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? संदीप देशपांडे म्हणाले, अतिशय खालच्या दर्जाचं…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -