जुगार खेळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

crime

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतण्या महेश शिंदे यांच्यासह १० जुगाऱ्यांना क्राइम ब्रांचने अटक केली आहे. महेश शिंदे यांच्यावर क्राइम ब्रांचने अटकेची कारवाई केली आहे. हे सर्वजण शहरातील जीसीसी क्लब या हॉटेलमधील एका रूममध्ये जुगार खेळत होते. ही रूम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे यांच्या नावावर बुक करण्यात आली होती.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी महेश शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई केली. मीरारोडमधील जीसीसी क्लब या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुरहाडे यांनी या हॉटेलवर छापा टाकला.

हॉटेलमधील ७९४ या क्रमांकाच्या रूममध्ये महेश शिंदे यांच्यासह १० जण जुगार खेळत होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. मात्र, चौकशी करून त्यांना सोडण्यात आले होते. परंतु या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदे यांच्यासह सर्व जुगाऱ्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय निर्णय घेणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : सरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी