मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची वेळ संपण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. तसेच, यावेळी त्यांनी धारावीतील जनतेला कोणाच्याही राजकारणाला बळी न पडण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिषदेत म्हणाले की, “काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलेले आरोप म्हणजे बालिशपणा आहे.” असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या आरोपांचे खंडन केले. (CM Eknath Shinde on congress allegations on dharavi project and adani connection)
हेही वाचा : BJP Vs Congress : राहुल गांधींच्या ‘एक हैं तो सेफ हैं’चा अर्थ…., नड्डा यांचा पलटवार
“राहुल गांधी यांनी मुंबईत तिजोरी आणली होती. आम्हाला वाटलं त्यांनी महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी ही तिजोरी आणली आहे. पण त्यांनी त्यामधून अदानी यांचा फोटो काढला. महाराष्ट्र लुटण्यासाठी इथल्या तिजोऱ्या कमी पडल्या, तर यांनी आता दिल्लीवरून तिजोरी आणली आहे. हा सर्व बालिशपणा आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही जमीन अदानी यांना दिलेली नाही. आम्ही जमीन डीआरपीला (Dharavi Redevelopment Project) दिलेली आहे. त्यांच्याकडून 2 लाख नागरिकांना तिथे घरे मिळणार आहेत. मविआचे सरकार असताना त्यांनी सांगितले की फक्त पत्र लोकांना द्या. आम्ही सांगितले, जेवढे लोकं असतील त्या सगळ्यांना द्या. 60 हजार लोकांना घरे देण्याचा निर्णय त्यांचा तर 2 लाख लोकांना घरे देण्याचा आमचा निर्णय.” असे म्हणत त्यांनी मविआवर निशाणा साधला.
“रोहित पवार हे अदानी यांची गाडी चालवताना एका फोटोमध्ये पहिले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत अदानी यांच्या बैठकाही झालेल्या आहेत. मग कुठे फिसकटले?” असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. ते म्हणाले, “आता त्याम्ही त्यांना विरोध करत आहात. म्हणजे सत्तेत होता, तेव्हा तुम्हाला माहिती होते, की हा प्रोजेक्ट आपल्या हातात येईल. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्ही विरोध करत आहात. 20 लाख घरे म्हणजे एका घराची किंमत 1 कोटी असेल तर 2 लाख कोटींची घरे जर धारावीकरांना मिळत असतील, तर तुमच्या पोटात का दुखत?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच, “माझे धारावीकरांना आवाहन आहे, त्यांनी कोणाच्याही राजकारणाला बळी पडू नये. धारावीकरांनी स्वतःचा फायदा कशात आहे? ते बघितले पाहिजे.” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, डीआरपी ही सरकारी कंपनी आहे, त्याचा अदानी यांच्याशी काहीही संबध नाही, असेदेखील स्पष्ट केले.