मला व्हीआयपी ट्रिटमेंट नको, वाहतूक रोखू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

eknath shinde

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको,असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून दिले आहेत.

ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. मात्र त्यांच्या प्रवासात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी संबंधित प्रवास मार्गावरील वाहतूक थांबवली जाते. यामुळे ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते, तसेच सुरक्षेसाठीच्या बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले जातात. या कामाला ताण पोलीस दलावरही वाढतो. असे गेल्या तीन चार दिवसांपासून प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले.

या व्यवस्थेचा लोकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो. यात अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्यास रुग्णांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सूत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या प्रवासाचा वाहन चालकांना नाहक त्रास नको, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली