नाशिक अपघाताचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश

cm eknath shinde orders inquiry for sinnar shirdi highway Nashik accident and announced 5 lakh families of deceased

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

नाशिकमधील सिन्नर – शिर्डी महामार्गावर एका खासगी बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. यानंतर खासगी बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत, आज सकाळी 6 च्या सुमारास नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावर पाथरेजवळ हा अपघात झाला आहे. दरम्यान अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून बस एका बाजूने पूर्णपणे तुटली आहे.

या अपघातावेळी बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 प्रवाशांची ओळख पटली असून तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या अपघातातील 16 रुग्णांवर यशवंत हॉस्पिटल, ३ रुग्णांवर मातोश्री हॉस्पिटल आणि एका रुग्णावर डॉ. साळुंखे हॉस्पिटल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकूण 20 प्रवाश्यांवर या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.


नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी