ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडी, या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी हजेरी लावली यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. (CM Eknath Shinde said that government will give Maratha reservation )
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन कटीबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करत आहेत. मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून 12 आणि 13 टक्के आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण उच्च न्यायालयातही टिकलं होतं. त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या धक्का लागला नव्हता. पण दुर्दैवानं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं. मध्यंतरी तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यावर योग्य पद्धतीनं बाजू मांडली गेली नाही, याची मराठा समाजाला कल्पना आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे हे राज्याचा दौरा करत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाबत त्यांना विचारल्यावर, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठाचे भाषा आम्हाला शिकवू नये, असा इशाराही दिला. सनातन धर्माला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दहीहांडीच्या निमित्ताने गोंविदा थर लावत आहेत, दुसरीकडे राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचे त्यांनी सांगितले. आता अहंकाराचे थर कोसळले असून विकास आणि प्रगतीचे थर रचले जात असल्याचेही ते म्हणाले.
देशात,राज्यात मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नसून २०२४ ची लोकसभेची हंडी हे मोदीच फोडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर हंडीला वरूण राजाही प्रसन्न झाला आहे. मुंबईत तसेच ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोहचला असून, खरं म्हणजे ठाणे हे गोविंदा पथकांचं आकर्षण आहे. धर्मवीर आनंद दिघें यांनी हा उत्सव सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करू लागले. आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत, कोरोना काळात लावण्यात आलेली सर्व नियम, निर्बंध काढून टाकली , गणपती उत्सवावरील सर्व बंधने काढून टाकली. यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली, थर लावताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, सरकारने यावेळी प्रो-गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश आहे, गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली, १० लाखांचा विमा देखील काढला, त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला गालबोट लागता कामा नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा टेभी नाका मित्रमंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.
अभिनेत्री राकुल प्रीत कौर हिची हजेरी
अभिनेता जॅकी बगनानी आणि अभिनेत्री राकुल प्रीत कौर यांनीही हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना अभिनेत्री राकुल प्रीत कौर यांनी हा माझा पहिला दहीहंडी उत्सव आहे. मला आनंद आहे ठाण्यात येऊन हा उत्सव साजरा करायला मिळाला असल्याचे सांगत, सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर अभिनेता जॅकी भगनानी यांनी बोलताना मी अनेक हंडी बघितल्या पण असा उत्सवातील उत्साह कधीच पहिला नसल्याचे सांगितले.