देशद्रोह केलेल्यांसोबत चहा घेण्याची वेळ टळली – एकनाथ शिंदे

‘हसीना पारकर हिला चेक दिले होते. त्याचे मंत्री जेलमध्ये गेले. त्यांनी खरा देशद्रोह केला होता. पण त्यांचा राजीनामा घेण्याची यांनी हिंमत नाही दाखवली. बर झाले त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिण्याची आमची वेळ टळली’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. देशद्रोह केलेल्यांसोबत आम्हाला चहा घेण्याची वेळ टळली असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना लगावला.

वर्षा बंगल्यावर झालेल्या २ कोटी ३८ लाख चहापानाच्या खर्चावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, वर्षा बंगला अडीच वर्षांपासून बंद होता. आता राज्यभरातून तिथे लोक येतात. तिथे आलेल्या लोकांना चहापानी नाही द्यायचा का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. मुख्यमंत्री निवासस्थानी येणाऱ्यांना आम्ही बिऱ्याणी देत नाही, असा टोलांही त्यांनी विरोधकांना लगावला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, ऑनलाईन – फेसबुक लाईव्ह सरकार होते तेव्हा दर महिन्याला ४० लाख रुपये चहापानाचं बिल येत होतं. असाही टोला शिंदेनी लगावला.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

राज्य सरकारची गेल्या आठ महिन्यातली अवस्था परिस्थिती बघितली तर, राज्याचे मुख्यमंत्री हे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याची ताकद, क्षमता नाही. राज्याबाहेरील शक्तींच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचा कारभार चालू आहे. स्वविचाराने निर्णय घेण्याचा, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. अशा नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज संध्याकाळी चहापानाला बोलवलं होतं. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता. राज्यातील जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती. त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं, आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळं सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे.