मुख्यमंत्री शिंदेची गाडी सुसाट, फडणवीसांनी कधी जोडले हात, तर कधी डोक्यावर मारला हात

खरी चर्चा रंगली ती गेल्या अनेक दिवसांपासून मोजकंच बोलणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या तुफान बॅटींगची.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस हा सगळ्यांसाठीच खेळीमेळीचा ठरला असला तरी आजचा दुसरा दिवस मात्र नेतेमंडळींच्या कोपरखळ्यांबरोबरच भाषणातून एकमेकांना चिमटे काढण्यात गेला. पण खरी चर्चा रंगली ती गेल्या अनेक दिवसांपासून मोजकंच बोलणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या तुफान बॅटींगची. यावेळी सुसाट सुटलेल्या शिंदे यांच्या फटकेबाजीमुळे आपण अडचणीत येऊ की काय या धास्तीने महाराष्ट्राचे चाणक्य असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुरती गोची झाली. अखेर शिंदेना कसं थांबवाव हेच कळत नसल्याने फडणविसांवर कधी डोक्यावर हात मारण्याची तर कधी हात जोडण्याची वेळ आली.

आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आलं. यामुळे फडणवीस शिंदे गट पुरता जोशात होता तर मविआमधील नेते मात्र वेगळ्याच मूडमध्ये होते. यावेळी अधिवेशनाचा पूर्वाध राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलाच गाजवला. आपल्या मिश्किल पण बोचऱ्या शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोलच केला. तर त्यानंतर तेवढ्याच जोमात अधिवेशनाचा उत्तरार्थ दणाणून सोडला तो नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. शिंदे यांचे आजचे भाषण हे कोणाकडूनही लिहून घेतलेले भाषण नव्हते तर त्यांच्या मनातील तळमळच होती. यामुळे शिंदे यांच्या भाषणाला आज वेगळाच साज चढला होता. मध्येच ते गंभीर होऊन बोलत होते. तर मध्येच ते दुहेरी अर्थाने बोलत असल्याने सगळ्या विधानसभेत हंशा पिकला होता. ते भडाभडा बोलत होते. बोलण्याच्या ओघात त्यांनी त्यांच्या शिवसेनेच्या सुरुवातीच्या प्रवासापासून ते बंडखोर आमदार आणि थेट मुख्यमंत्री या प्रवासाचे जिवंत वर्णन तर केलेच शिवाय बंडखोरीच्या कालावधीत फडणवीस आणि त्यांच्या लेटनाईट मिटींगां कशा झाल्या हे देखील उघड केले. मात्र ते बोलण्याआधी ते फडणवीसांनाच बोलू का सांगू का असेही विचारत होते.

यावर फडणवीस यांनाही हसू आवरेनासे झाले. त्यांनी अनेकवेळा शिंदे यांना थांबण्याचा इशाराही केला. पण शिंदे आज सुसाट होते. यामुळे या शिंदेशाहीला रोखायचे कसे या विचाराने हतबल झालेल्या फडणवीसांनी अनेकवेळा डोक्याला हात लावल्याचे सगळ्या महाराष्ट्राने बघितले.

दरम्यान बोलण्याच्या ओघात शिंदे यांच्याकडून साला हा शब्द वापरला गेला. त्यानंतर त्यांनी हा शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. मात्र जयंत पाटलांनी शब्द मागे घेऊ नका , हे नैसर्गिकच राहू द्या असे त्यांना सांगितले. त्यानंतर मात्र शिंदे न थांबता बोलत राहीले.