हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. ज्या बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला वाढवायची आहे. तसेच ज्या बाळासाहेबांचे विचार आम्हाला वाढवायचे आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. तसेच त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी शिंदेंसोबत आमदार संजय राठोड, बालाजी कल्याणकर, दादा भुसे, असे अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते.

हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलंय

आम्ही बहुमताचा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहोत. त्यांच्या स्मारकावर अभिवादन आम्ही केलं आहे. हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार आज स्थापन झालेलं आहे. या राज्यामध्ये सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. शेतकरी, कामगार आणि कष्टकरी, समाजातील सर्व घटक असतील, या सर्वांना हे सरकार न्याय देईल, असं एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांसमोर म्हणाले.

कसा असेल प्रवास?

एकनाथ शिंदे पहिले चैत्यभूमीवर दाखल झाले होते. तिथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे दाखल झाले. तिथेही त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केल. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिवाजी पार्कनंतर ते ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे पहिल्यांदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल होतील. तसेच त्यांच्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमाला ते भेट देतील. तसेच टेंभीनाक्यावरील आनंद दिघे यांच्या अर्धकृती पुतळ्याला ते अभिवादन करतील. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.


हेही वाचा : व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र फडणवीस