शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

'महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे', अशा शब्दांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक साद घातली आहे.

CM Eknath Shinde

‘महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे’, अशा शब्दांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक साद घातली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ दिवस आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. त्यावेळी विरोधकांनी राज्यात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. विरोधकांच्या या मागणीवरून सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. (cm eknath shinde talk on farmer suicide)

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आलेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवत आहात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं”, असे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.

“तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं. वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलं. लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात”, असेही मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.

“माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं.’ शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना समजतात, काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं.” असे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.

“मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे. याची खात्री बाळगा, जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया”, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.


हेही वाचा – सत्ता द्या, सर्व टोल बंद करतो; टोलमुक्तीवरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी