घरताज्या घडामोडीहिंमत दाखवण्याची भाषा करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

हिंमत दाखवण्याची भाषा करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

नागपूर – रोज आम्हाला आव्हाने देण्यात येत आहेत. सहन करायला एक मर्यादा असते. तुम्ही कोणावर आरोप करताय, ज्याला तुमची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत त्यांच्यावर. जे स्वत: घरातून कधी बाहेर पडत नाहीत त्यांनी हिंमत दाखवण्याची भाषा करू नये. हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून लढणारा आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या टीकेचाही समाचार घेतला.

हे सरकार आज पडणार, उद्या पडणार असे रोज बोलता, पण लक्षात ठेवा आमचे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करेलच तसेच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे पक्ष पुढची निवडणूकदेखील पूर्ण बहुमताने जिंकतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नका. माझा स्वभाव टीका करणार्‍यातला नाही म्हणून मी शांत असतो, पण शांत आहे म्हणून त्याला माझी हतबलता समजू नका. मै खामोश हू क्यो की मै सब जानता हू, बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

वर्षावर जेव्हा लिंबे सापडली ज्या प्रबोधनकारांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले, त्यांचेच वारस आता लिंबू फिरविण्याची भाषा करू लागले आहेत. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा लगेच वर्षा या शासकीय निवासस्थानी गेलो नाही. जरा तिकडे काय आहे हे पाहायला सांगितले. तेव्हा पाटीभर लिंबे सापडली. आणखीही काय काय सापडले. या लोकांनी बाळासाहेब आणि प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत नाही मी रेशीमबागेत गेलो म्हणून टीका करीत आहेत, पण बाळासाहेबांचे विचार आम्ही मानतो म्हणूनच रेशीमबागेत गेलो. गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.

- Advertisement -

मी माझ्या शेतावर हेलिकॉप्टरने गेलो म्हणून मला हिणवण्यात आले. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा असे बक्षीस लावले, पण मला माझा शेतकरीदेखील हेलिकॉप्टरने शेतात जाताना बघायचा आहे. अडीच वर्षे घराबाहेरच न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असेही आम्ही म्हणू शकतो, पण ते बक्षीस मिळू द्यायचे नव्हते म्हणून आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारच बदलले, असेही शिंदे म्हणाले.

उद्योगांकडे मागितलेल्या टक्केवारीची चौकशी उद्योगांच्या जमिनीत काय घोटाळे झाले, उद्योगांकडे कोण टक्केवारी मागायचे याची चौकशी करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आता उद्योग बाहेर जाताहेत म्हणून आमच्यावर टीका करतात, पण उद्योग असे दोन-तीन महिन्यांत बाहेर जात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी फोन केला होता. तेदेखील तेच म्हणाले. आधीच्या सरकारनेच काही केले नाही म्हणून उद्योग बाहेर गेले. आता जे उद्योगपती आमच्याकडे येतात त्यांना लगेच परवानगी मिळते, असेही शिंदे म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावतचे घर तोडण्यासाठी वकिलाला फी म्हणून जनतेच्या पैशांतून ८० लाख रुपये दिले. महिला खासदाराला १३ दिवस तुरुंगात टाकले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठविले. पत्रकारांना तुरुंगात टाकले. आमच्याविरोधातही चौकशा लावल्या. देवेंद्रजींनाही अडकवण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांचा तर पूर्ण कार्यक्रमच करून ठेवला होता. ही सत्तेची मस्ती नव्हती काय, असा सवाल शिंदे यांनी केला. कायदा-सुव्यवस्था आम्हाला कोणी सांगायची, ज्यांचा गृहमंत्रीच तुरुंगात गेला आणि दुसरा मंत्री दाऊदसोबतच्या संबंधांवरून तुरुंगात आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

पोलिसांनी चार हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. लहान मुलांच्या पोर्नोग्राफीवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात अटक केली. बलात्काराच्या गुन्ह्याच्या दोषसिद्धीत वाढ झाली आहे. वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. निर्भया पथकासाठी ७६८ वाहने खरेदी करण्यात आली. पोलिसांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. सायबर इंटेलिजन्सची स्थापना केली आहे. ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायदा करणार आहोत. शक्ती कायदादेखील केंद्राकडे पाठवला आहे. त्यालाही लवकरच मान्यता मिळेल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -