मुख्यमंत्री मध्यरात्री दोन वाजता पोहोचले कसब्यात; काय आहे कारण?

पुणेः कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन वाजता कसबा पेठ मतदारसंघात भेट दिली. यावेळी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. तेथे त्यांची भरत गोगावले, नरेश म्हस्के यांच्यासोबत बैठक पार पडली. ही बैठक कसबा पेठ निवडणुकीसंदर्भात होती, असेही बोलले जात आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून तर मध्यरात्री २ वाजता एवढी गर्दी थांबली आहे. सर्वजण मला भेटायला आले. त्यांच्या प्रेमाचा मी ऋणी आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भव्य कार्यालय उभं केलं आहे. हे कार्यालय बघायला मी आलो.

कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या वर्षी निधन झाले. निवडणूक आयोगाने त्यांच्या जागी पोट निवडणूक जाहिर केली. ही पोट निवडणूक जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीने तयारी सुरु केली. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह भाजपमधील नेत्यांनी धरला आहे. मात्र त्या आग्रहाला धुडकावत महाविकास आघडीने या पोट निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यासोबतच भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासन यांची उमेदवारी जाहिर केली. ब्राम्हण उमेदवार न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज आहे. ही नाराजी दूर करण्यासाठीच भाजपने खासदार गिरीष बापट यांना प्रचारासाठी आणले होते. कार्यकर्त्यांना खासदार बापट यांनी मार्गदर्शन केले.

ही चुरशीची निवडणूक नाही. ही निडणूक आपण जिंकणार. चांगल्या मतांनी जिंकणार. कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पडावी. मुक्ता शिवाय या सभागृहात सांगूही शकत नाही, असे सांगताना भाजप खासदार गिरीष बापट हे भावनिक झाले होते. तेव्हा उपस्थित महिला कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

मात्र गिरीष बापट यांना प्रचारात उतरवल्याने भाजपवर टीका झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष जगताप यांनी भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले, कसबा प्रचारासाठी बोलावून भाजप हे खासदार बापटांच्या जीवाशी खेळत आहे. भाजपने गेली पाच वर्षे बापट यांना बाजूला ठेवले. कसबा पोट निवडणुकीचा उमेदवार धोक्यात आल्याचे लक्षात येताच भाजपला खासदार बापट यांची आठवण झाली. बापट यांना अशी वागणूक देणाऱ्या व त्यांना प्रचारासाठी बोलवणाऱ्या भाजपला पुणेकर कधीच माफ करणार नाहीत, अशा इशारा जगताप यांनी दिला.