Homeमहाराष्ट्रCM Fadnaivs : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, कोणीही राजकारण...

CM Fadnaivs : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, कोणीही राजकारण करु नये

Subscribe

नागपूर – बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या ही गंभीर घटना आहे. या हत्या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये. राजकारणाऐवजी समाजात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जे जे दोषी अढळतील त्या प्रत्येकावर कारवाई होईल, एकाही दोषीला सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी संबंधी विचारलेल्या प्रश्नावर म्हटले आहे. बीड प्रकरणात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्या येत असतील तर त्यांनी तक्रार करावी, पोलीस कारवाई करतील असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झालेला नाही – फडणवीस 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा, मास्टरमाईंडवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुठल्याही मुद्द्यावरुन सार्वजनिक ठिकाणी मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण क्षमतेने काम करत आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झालेला नाही. जर कोणी तसा प्रकार केला तर कोणालाही वाचवू देणार नाही, असाही विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला.

बीड मधली दादागिरीचा उल्लेख न करता मुख्यमंत्री म्हणाले की, जे दादागिरी किंवा दहशत निर्माण करण्याचा, जनतेवर जरब बसवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर वचक बसवला जाईल. बीड प्रकरणात पोलिसांची योग्य कारवाई सुरु आहे. असंही फडणवीस म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सध्या बीडमध्ये मुक्काम ठोकून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे त्यांना मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप आज अंजली दमानिया यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंजली दमानिया यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे द्यावी. पोलीस त्यावर योग्य पाऊल उचलून कारवाई करेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

कोणत्याही दोषीला सोडणार नाही – फडणवीस

देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कुठेही गेले तरी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राजकारण करण्याची गरद नाही. चौकशी होत आहे. त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, हा आमचा शब्द आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : Suresh Dhas : अजितदादा तुमच्या पाया पडतो याला बाहेर काढा; नाव न घेता सुरेश धसांचा मुंडेंवर हल्लाबोल