घरमहाराष्ट्रखलनायक ठरवा वा वाईट बोला जबाबदारी पार पाडूच

खलनायक ठरवा वा वाईट बोला जबाबदारी पार पाडूच

Subscribe

मुख्यमंत्र्यांचे भाजपला शालजोडे

कोरोना काळात राज्याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्याचा मोठेपणा ज्यांच्यात नाही ते आपल्या राज्याची तुलना बिहारबरोबर करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचे मोठेपण नको आहे. या राज्यातल्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला कोणी वाईट बोला वा खलनायक ठरवा, आम्ही ही जबाबदारी पार पाडूच, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या भाषणात विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपला अनेकदा टोले हाणले. यात त्यांनी शेतकरी हाच या देशाचा मालक आहे, त्याला रस्त्यावर आणण्याचा कृतघ्नपणा केंद्राने केल्याचा आक्षेप नोंदवला.

राज्यातल्या जनतेला कोविड काळात भरलेली शिवभोजन थाळी दिली. रिकामी थाळी वाजवायला सांगितली नाही, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थाळी वाजवण्याच्या आवाहनाची टर उडवली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या राज्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले ही भाषा छत्रपतींची आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा न देणारे छत्रपतींचा अवमान करत आहेत, असे म्हटले. छत्रपतींची भाषा भिकारी नाही, असे बजावताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यासाठी आम्ही कदापि भीक मागणार नाही, असे स्पष्ट केले. हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याच्या भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची चिरफाड करताना मुख्यमंत्री म्हणाले, सावरकरांच्या नावाचा सातत्याने उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना भारतरत्न मिळावे म्हणून तुमच्या सरकारनेच प्रस्ताव फेटाळावे, याचा त्यांनी निषेध नोंदवला. निर्माण काही करायचे नाही, जे आयते आहे, त्यावर दावा करायचा ही तुमच्या कामाची पध्दत आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्यासाठी आमच्या पक्षाने काही केले नाही, हे आम्ही उघडपणे सांगतो; पण तुमच्या शिखर संस्थेने काय केले ते सांगा, असे उघड आव्हानच मुख्यमंत्र्यांनी दिले. ज्या सरदार पटेल यांचे नाव राजकारणासाठी घ्यायचे आणि त्यांचेच नाव स्टेेडियममधून हटवायचे, असले उद्योग आम्ही कधी केले नाहीत. औरंगाबादचे संभाजीनगर करणे ही आमची भूमिका आहे, असे सांगताना त्यांनी पण याच संभाजीनगरच्या साध्या विमानतळाला संभाजी राजांचे नाव देण्याचा प्रस्ताव तुम्ही मान्य करत नाहीत, यावरून तुमचे महाराजांच्याप्रति प्रेम किती बेगडी आहे, ते कळते, असा हल्ला त्यांनी चढवला.

कोरोनाचे राजकारण करणार्‍यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे द्यावेसे वाटले नाहीत. त्यांनी ते पंतप्रधान केअर निधीला दिले. ज्या फंडाचा हिशोबही कोण देत नाही. कोण तो मागतही नाही. मागितल्याचे परिणाम त्यांना पुरते ठावूक असल्याचे सांगत त्यांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले. कोण्या आर्थिक डॉक्टरने महाराष्ट्राच्या कोरोना आकडेवारीचे गणित पुढे केले. ज्या डॉक्टरने नोटबंदीचे उघड समर्थन केले होते. असल्या लोकांकडून काय अपेक्षा करायच्या? रुग्णसंख्येचा आम्ही बाजार केला नाही, करणार नाही, जे खरे ते खरे, दाराआड खोटे बोलणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. संकटात आपल्या राज्याने मजुरांची केलेली व्यवस्था आणि त्यांना घरपोच करण्याची केलेल्या धडपडीचे या मजुरांनी कौतुक केले. पण टीकाकारांना कौतुक करावेसे वाटणार नाही. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत, असे ते म्हणाले. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणी आपल्याला खलनायक ठरवले तरी बेहत्तर आपण मागे हटणार नाही, गोरगरिबाला ते परवडणार नाही, त्याची चूल जळणार नाही, असे ऐकवत मुख्यमंत्र्यांनी गॅससह इंधन दरवाढीवरही कोरडे ओढले. जनतेच्या जीवाशी खेळणे थांबवा, असे त्यांनी विरोधकांना बजावले.

- Advertisement -

हा देश म्हणजे काहींना खासगी मालमत्ता वाटते, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. शेतकर्‍यांचे आंदोलन नेस्तनाबूत करण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्या. आंदोलकांची वीज कापली, त्यांचे टॉयलेट तोडण्यात आले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकण्यात आले. बांगला देश आणि चीनच्या सीमा जणू दिल्लीतच असल्याचा भास झाला. देश ही मालमत्ता शेतकर्‍यांची आहे, याची जाणीव ठेवा, असे त्यांनी बजावले. उध्दव ठाकरेंच्या आजोळचा उल्लेख करणार्‍या मुनगंटीवार यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या माझ्या आजोळला महाराष्ट्रापासून तोडण्याचे डोक्यातून काढून टाका, असे ऐकवले. कोणी ते करणार असेल तर आम्ही ते करू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आपल्या भाषणात उल्लेख करणार्‍या भाजप नेत्यांना त्यांनी बाळासाहेबांचा पुळका का यायला लागला, अशी विचारणा केली. ते म्हणाले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा उदोउदो करणार्‍यांना त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे जाणवे, शेंडीचे नव्हते, असे म्हटले.

बाबरी पाडण्यात आली तेव्हा ती जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हते, असे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता म्हटले. काश्मीरमध्ये पंडितांना हुसकावण्यात आले तेव्हा बाळासाहेबच त्यांच्या मागे होते. तुम्ही 370 कलम रद्द केले आणि कितींना तिथे बसवलेत, अशी विचारणा त्यांनी केली. दाराआडची गोष्ट  निर्लज्जपणे टाळता आणि बाहेर येऊन खोटेच सांगता, असा हल्ला त्यांनी अमित शहा यांचे नाव न घेता केला.

फडणवीसांची माफी

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणत अपक्ष आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. या उल्लेखानंतर सत्ताधारी चांगलेच भडकले. तिन्ही पक्षांचे आमदार वेलमध्ये जमू लागले. वातावरण तापू लागताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या एकेरी उल्लेख कदापि योग्य नाही, असे सांगत असा उल्लेख करण्यात आल्याबद्दल फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली.

लॉकडाऊनची इच्छा नाही

बसलेली घडी विस्कटवण्याची आपली तयारी नाही. राज्य आता रुळावर आले आहे. यातच कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी हात धुणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापरच आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. याचा अतिरेक झाला तर गंभीर परिणाम होतील, असे सांगत राज्याची बसलेली घडी विस्कटेल हे लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याची आपली इच्छा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -