घरताज्या घडामोडीप्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, प्रदूषण करणारे फटाके टाळा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, प्रदूषण करणारे फटाके टाळा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही. या सहकार्यामुळेच आपण तणावमुक्त आहोत. दुसऱ्या लाटेची चिंता आहे. ती येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

या दिवाळीत फटाके न फोडण्याचा स्वत: संकल्प करा. आतापर्यंत जे आपण कमावले आहे ते चार दिवसाच्या धूरामध्ये वाहून जाता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी फटाके लावू नयेत. आपल्याला समाजाची काळजी घ्यायची आहे. रोषनाई जरुर करा, पण फटाके वाजवू नका. तुमच्यावर मी आणीबीणी आणत नाही आहे. मी काय तुम्हाला फटाके वाजवूच नका, फटाक्यांवर बंदी घालत नाही आहे. केवळ हा सण आनंदाने, जास्त फटाके न वाजवता साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

आता जरी परिस्थिती आटोक्यात दिसत असली तरी दिवाळीत आणि दिवाळीनंतरचे १५ दिवस कसोटीचे आहेत. याचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशात ज्या पद्धतीने कोरोनाचे आकडे वाढले आहेत. तीच परिस्थिती आपल्या इथे नको आहे. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्याकडे ही लाट यायला द्यायची नाही आहे. त्यासाठी आपल्याला सर्व ती काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या लढाईत मास्क हेच महत्त्वाचे शस्त्र आहे. सर्वांनी मास्क वापरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याबाबत घाई करून चालणार नाही. सर्वप्रथम आपल्याला मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार झाली पाहिजे. मंदिरे, मशीद, चर्चमध्ये आपण तल्लीन होऊन आरत्या करत असतो. या तल्लीनतेचा परिणाम आपल्याला नंतर भोगता कामा नये, यासाठी मंदिरे, मशीद आणि चर्च उघडण्यात उशीर करत आहोत. यावरुन माझ्यावर अनेकजण टीका करत आहेत. पण जनतेसाठी वाईटपणा घेण्याची माझी तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी गर्दी टाळा हाच मंदिरासाठी नियम, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी राज्याला बदनाम केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी १७ हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुंबईकरांच्या विकासात मिठाचा खडा

राज्य सरकारने मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जमिनीची निवड केली. ही जमीन मिठागाराची असून ती केंद्राच्या मालकीची असल्याचे आता अनेकजण सांगत आहेत. मात्र, कांजूरमार्गची जमीन मिठागाराची आहे, हे सांगणाऱ्यांना आपण मुंबईकरांच्या विकासाच्या मार्गात मिठाचा खडा टाकतोय, याची जाणीव नाही का, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल असे आश्वासन दिले आहे. लोकल ट्रेन सूचनेनुसार हळूहळू सुरू होत आहेत. याबाबतीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आपल्याला चांगल्याप्रकारे सहकार्य करतील, अशी खात्री असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी रेल्वमेमंत्र्यांना चिमटा काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -