मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ठरले; मुख्यमंत्र्यांसह जावेद अख्तर राहणार उपस्थित

समारोपाला खासदार शरद पवार, माजी न्यायमूर्ती चपळगावकर उपस्थित राहणार

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमिपूजन संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते झाले.

कुसुमाग्रज नगरीत होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यंदा राजकीय राबता पाहायला मिळणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार असून समारोपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत.

संमेलनासाठी नाशिकमधील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पसमध्ये कविवर्य कुसमाग्रज नगरी सज्ज होत आहे. यासाठी संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमिपूजन संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ३ डिसेंबरपासून होणार्‍या संमेलनाच्या उद्घाटकांच्या नावाची घोषण झालेली नव्हती. यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गीतकार गुलजार, गीतकार जावेद अख्तर, गायिका आशाताई भोसले यांची नावे चर्चेत होती. शनिवारी संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, डॉ. शेफाली भुजबळ, संजय करंजकर, प्रा. शंकर बोर्‍हाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नाशिक ही साहित्याची कर्मभूमी असून नाशिकला सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभला आहे. हे संमेलन नाशिकच्या मराठी साहित्य चळवळीसाठी दिशादर्शक ठरेल. नाशिककर मोठ्या सन्मानाने येणार्‍या साहित्यिकांचे स्वागत करतील. – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

कोरोनाच्या संकटामुळे साहित्य संमेलनाला उशीर झाला असला तरी आयोजकांनी केलेली तयारी अतिशय उत्तम असून बाहेरून येणार्‍या साहित्यिकांना आकर्षित करणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी करण्यात येईल. – सतीश कुलकर्णी, महापौर